मुंबईत दैनिक जनसहाराच्या मुख्य व कार्यकारी संपादकांचा दुहेरी सन्मान; ‘अजय लेखणी’ व ‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्काराने गौरव आर्यारवी एंटरटेनमेंटच...
मुंबईत दैनिक जनसहाराच्या मुख्य व कार्यकारी संपादकांचा दुहेरी सन्मान; ‘अजय लेखणी’ व ‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्काराने गौरव
आर्यारवी एंटरटेनमेंटचा प्रतिष्ठेचा सन्मान; पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल
मुंबई प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुंबईतील दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात आर्यारवी एंटरटेनमेंटच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात दैनिक जनसहाराच्या संपादकीय नेतृत्वाचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात दैनिक जनसहाराचे मुख्य संपादक भारत वानरे यांना प्रतिष्ठेचा 'अजय लेखणी पुरस्कार', तर कार्यकारी संपादक पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर यांना 'स्वाभिमान लेखणी पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
आर्यारवी एंटरटेनमेंटचे संस्थापक महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्यिक, पत्रकार, संपादक, समाजसेवक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन दोन्ही संपादकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी आयोजकांनी सांगितले की, दैनिक जनसहाराने समाजातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत निर्भीड, निष्पक्ष आणि जनहिताची पत्रकारिता केली आहे. समाजमन जागृत करणाऱ्या लेखणीचा सन्मान म्हणून हे पुरस्कार प्रदान करण्यात आले असून, ही संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला श्रीधर कीर, विसुभाऊ बापट, अरुण म्हात्रे, पंढरीनाथ तामोरे, गुरुनाथ तिरपनकर, सुनील शिर्के, वैभव कदम, कृष्णा काजरोळकर, ॲड. गौरव पाटील, अतुल तोडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभली.
दैनिक जनसहाराचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने केलेली निर्भीड पत्रकारिता, तर कार्यकारी संपादक पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर यांनी वृत्तसंपादनातील अचूकता, विश्वासार्हता आणि गुणवत्तापूर्ण संपादकीय नेतृत्वातून वृत्तपत्राची उंचावलेली प्रतिमा याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या दुहेरी सन्मानामुळे नांदेड जिल्ह्यासह राज्यभरातील पत्रकार, सामाजिक, राजकीय, साहित्यिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून दैनिक जनसहाराच्या संपूर्ण परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचकांनीही हा सन्मान जनतेच्या विश्वासाला मिळालेली पोचपावती असल्याची भावना व्यक्त केली.
हा गौरव दैनिक जनसहाराच्या संपूर्ण संपादकीय टीमसाठी प्रेरणादायी असून, भविष्यातही निर्भीड, निष्पक्ष आणि समाजहिताची पत्रकारिता अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

No comments