पत्त्यांचा डाव रंगात आला असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचा छापा सात जुगारी ताब्यात सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्य...
पत्त्यांचा डाव रंगात आला असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचा छापा सात जुगारी ताब्यात
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कंबर कसली आहे.त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या तिरट जुगार क्लबवर छापा टाकला आहे.या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ जुगार्यांना रंगेहात अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह १ लाख ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बांधकामाच्या आडोशाला रंगला होता डाव
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अरविंद भिंगारदिवे,सुनील पवार, पंकज व्यवहारे,योगेश भिंगारदिवे आणि योगेश कर्डीले यांचे पथक १३ जुलै २०२६ रोजी भिंगार परिसरात अवैध धंद्यांची माहिती काढत गस्तीवर होते.या दरम्यान पथकाला एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की,सोलापूर रोड लगत असलेल्या सारसनगर मधील हॉटेल आरवीच्या शेजारी एका चालू बांधकामाच्या आडोशाला काही इसम गोळा झाले असून पैशांची हार-जीत लावून 'तिरट' नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत आणि खेळवत आहेत.अशी
माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचून सदर बांधकामाच्या ठिकाणी छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच पळापळ झाली.मात्र,सतर्क पोलिसांनी घेराव घालत जुगार खेळणाऱ्या ७ जणांना जागीच ताब्यात घेतले.बाबासाहेब ज्ञानदेव बेरड (वय ५६,रा. दरेवाडी,अहिल्यानगर),संजय प्रभाकर तडके (वय ६२,रा. कोठी स्टेशन रोड, अहिल्यानगर),भास्कर भानुदास जगधने (वय ६२,रा. कोंबडीवाला मळा,सोलापूर रोड,अहिल्यानगर)
संजय रामा भिंगारदिवे (वय ५४, रा.दरेवाडी,अहिल्यानगर),
सुधीर डॅनियल शिंदे (वय ५५, रा. न्यू बेथेल कॉलनी, स्टेशन रोड,अहिल्यानगर),महादेव सदाशिव कराळे (वय ४६, रा. अगडगाव, अहिल्यानगर),
राजू भिवा मोरे (वय ५३, रा. आदर्श नगर,श्रीरामपूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे.पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता,त्यांच्याकडून १३ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराच्या ठिकाणी वापरले जाणारे १ लाख ५४ हजार रुपये किमतीचे ४ वेगवेगळ्या कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन,असा एकूण १,६७,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या सर्व आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७५/२०२६ नुसार 'महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ)' प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत.

No comments