काटेजवळगा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर लातूर, जि, प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हेमकां...
काटेजवळगा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
लातूर, जि, प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचा शासनाचा दावा असताना निलंगा तालुक्यातील काटेजवळगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे १७० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मंजूर सात पदांपैकी केवळ चार शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या शाळेसाठी मुख्याध्यापकांसह सात शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र सध्या मुख्याध्यापकांसह केवळ चार शिक्षक कार्यरत असून एक सहाय्यक शिक्षक व दोन प्राथमिक पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. परिणामी पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व वर्गांचे अध्यापन अवघ्या चार शिक्षकांवर अवलंबून आहे. अनेकदा एका शिक्षकाला एकाच वेळी दोन वर्गांची जबाबदारी सांभाळावी लागत असल्याने अध्यापनावर ताण निर्माण होत आहे.
शाळेत एकूण १७० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यामध्ये ७४ मुले व ९५ मुलींचा समावेश आहे. शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे आणि शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवणे कठीण होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असताना शिक्षकांची रिक्त पदे दीर्घकाळ न भरणे ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी तातडीने रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे. काटेजवळगा येथील रिक्त तीनही शिक्षकपदे तातडीने भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांनी दिला आहे. काटेजवळगा येथील १७० विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन रिक्त पदे भरावीत, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

No comments