आषाढी एकादशीनिमित्त जे.ई. स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगरचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हे...
आषाढी एकादशीनिमित्त जे.ई. स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगरचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न
प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जे.ई. स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे शुक्रवार (दि. २४) रोजी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत वारकरी परंपरेचा सुंदर अनुभव साकारला.
दिंडीची सुरुवात जे.ई. स्कूल परिसरातून करण्यात आली. नवीन मुक्ताई मंदिर मार्गे जुनी कोथळी येथील मुक्ताई मंदिरापर्यंत दिंडी नेण्यात आली. त्यानंतर पुन्हा विद्यालयात दिंडीचे आगमन झाले. संपूर्ण मार्गावर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविध धार्मिक व सांस्कृतिक देखावे सादर केले. टाळ, मृदुंग, पावली, फुगडी तसेच विठ्ठल नामघोषामुळे परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर, संचालक रमेश खाचणे, पुरुषोत्तम महाजन, प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्या व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे तसेच एस. एम. वाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडीला प्रारंभ झाला.
प्रास्ताविक प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांनी केले. तर एस. बी. वंजारी यांनी संत मुक्ताई यांच्या जीवनकार्याचा तसेच आषाढी दिंडी परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा दिंडी सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सहभागाचे व सांस्कृतिक सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.

No comments