यशोशिखर गाठलेल्या माजी विद्यार्थी डॉ. पांडुरंग पाटील यांची मातृसंस्थेला सदिच्छा भेट विद्यार्थी व शिक्षकांना दिले प्रेरणादायी मार्गदर्शन; क...
यशोशिखर गाठलेल्या माजी विद्यार्थी डॉ. पांडुरंग पाटील यांची मातृसंस्थेला सदिच्छा भेट
विद्यार्थी व शिक्षकांना दिले प्रेरणादायी मार्गदर्शन; कौशल्याधारित शिक्षणावर दिला भर
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर :- जे. ई. स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगरचे माजी विद्यार्थी तथा आंबेजोगाई येथील नामांकित सीबीएसई शाळेचे मुख्याध्यापक डॉ. पांडुरंग पाटील यांनी मंगळवार, दि. १४ जुलै रोजी आपल्या मातृसंस्थेला सदिच्छा भेट देत शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासासह मार्गदर्शनामुळे विद्यालय परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी शिक्षणाच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी प्रा. डॉ. ए. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली. गेल्या आठ वर्षांपासून त्यांनी कर्नाटकमधील प्रतिष्ठित सीबीएसई शाळेत मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावत राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ते आंबेजोगाई येथील सीबीएसई शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून CBSE Master Resource Person म्हणून राज्यभरातील शिक्षकांना इंग्रजी विषयातील आधुनिक अध्यापन तंत्राचे प्रशिक्षण देत आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही करतात.
यावेळी शिक्षकांशी संवाद साधताना डॉ. पाटील म्हणाले, "आजचा विद्यार्थी माहितीच्या युगात वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि इंग्रजीत आत्मविश्वासाने संवाद साधण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) नुसार कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे."
त्यांनी इंग्रजी व्याकरण सुलभ पद्धतीने शिकविणे, विद्यार्थ्यांचे भाषण कौशल्य विकसित करणे तसेच बोर्ड परीक्षा व स्पर्धा परीक्षांसाठी प्रभावी तयारी कशी करावी, याविषयीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विद्यालयाचे माजी ज्येष्ठ शिक्षक एस. डी. कुरकुरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एम. चौधरी होते. त्यांनी डॉ. पांडुरंग पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य चौधरी यांनी सांगितले की, "डॉ. पांडुरंग पाटील यांचा जीवनप्रवास हा विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. कोणतीही प्रतिकूल परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. त्यांच्या भेटीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण होईल."
याप्रसंगी उपप्राचार्य व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक के. आर. कवळे, व्ही. डी. बऱ्हाटे, एस. एम. वाढे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार एस. आर. ठाकूर यांनी मानले.

No comments