डेंग्यूमुक्त धरणगावासाठी विद्यार्थ्यांची जनजागृती; आदर्श विद्यालयात आरोग्य विभागाचा प्रभावी उपक्रम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण या...
डेंग्यूमुक्त धरणगावासाठी विद्यार्थ्यांची जनजागृती; आदर्श विद्यालयात आरोग्य विभागाचा प्रभावी उपक्रम
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यूसह एचपीव्ही लसीकरण व योग्य हात धुण्याच्या पद्धतीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, धरणगाव यांच्या वतीने आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथे डेंग्यू जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना डेंग्यू प्रतिबंध, वैयक्तिक स्वच्छता, एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व तसेच संसर्गजन्य आजारांपासून बचावाचे प्रभावी मार्ग समजावून सांगण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम जाधव व तालुका आरोग्य सहाय्यक संजय ठाकूर यांनी डेंग्यूची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, साचलेले पाणी नष्ट करण्याचे महत्त्व, घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करणे तसेच ताप आल्यास तातडीने शासकीय आरोग्य संस्थेत तपासणी करून उपचार घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एचपीव्ही (HPV) लसीकरणाचे महत्त्व पटवून देत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र मुलींनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी योग्य हात धुण्याची पद्धत (Hand Wash Technique) प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
याप्रसंगी आरोग्य पर्यवेक्षक भंगाळे, आरोग्य सहाय्यक आधार भोई, स्टाफ नर्स सुरेखा वसावे, पायल वाघ, एम.पी.डब्ल्यू. मयूर पाटील, शाळेचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी "डेंग्यूमुक्त परिसर, स्वच्छ परिसर" हा संकल्प करत डेंग्यू प्रतिबंध, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयी आपल्या कुटुंबात व समाजात रुजविण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments