शेताच्या बांधावर वीज प्रवाह सोडल्यास होणार गुन्हा; लातूर पोलीस अधीक्षकांचा इशारा. लातूर, जि.प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गाय...
शेताच्या बांधावर वीज प्रवाह सोडल्यास होणार गुन्हा; लातूर पोलीस अधीक्षकांचा इशारा.
लातूर, जि.प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी काही शेतकरी शेताच्या बांधावर किंवा कडेला उघड्या विद्युत तारांद्वारे विद्युत प्रवाह सोडत असल्याचे समोर आले आहे. ही पद्धत अत्यंत धोकादायक असून, या निष्काळजीपणामुळे मनुष्य किंवा जनावरांचा मृत्यू झाल्यास संबंधित शेतकऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. शेतकरी आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी बेकायदेशीररित्या शेताच्या बांधावर विद्युत प्रवाह सोडतात. मात्र, अशा प्रकारामुळे शेतात काम करणारे मजूर, पादचारी, नागरिक आणि मुक्या जनावरांचा जीव धोक्यात येत आहे. इतकेच नव्हे, तर अनेकदा संबंधित शेतकऱ्यांच्या घरातील सदस्यांनाही या विजेच्या धक्क्याचा फटका बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
पोलीस प्रशासनाचे कडक निर्देश
या गंभीर बाबीची दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केले आहे की, आता यापुढे अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या शेतकऱ्यांची गय केली जाणार नाही. जर शेतातील विद्युत प्रवाहामुळे कोणाचा जीव गेला किंवा कोणी गंभीर जखमी झाले, तर संबंधित शेतकऱ्याविरुद्ध कायद्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल.
शेतकऱ्यांना सुरक्षित उपाययोजनांचे आवाहन
लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, पिकांच्या सुरक्षेसाठी विद्युत प्रवाहाचा वापर करण्याऐवजी सुरक्षित व कायदेशीर पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करावा. मानवी जीवनाचे रक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी आणि त्यानंतर ओढवणारे कायदेशीर संकट टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


No comments