adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गूळ धरणाचे तीन दरवाजे उघडले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा चोपडा तालुक्यात मुसळधार पाऊस; अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत प्रशासनाचे नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आव्हान

  गूळ धरणाचे तीन दरवाजे उघडले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा चोपडा तालुक्यात मुसळधार पाऊस; अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत प्रशासना...

 गूळ धरणाचे तीन दरवाजे उघडले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चोपडा तालुक्यात मुसळधार पाऊस; अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत

प्रशासनाचे नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आव्हान   


प्रतिनिधी  चोपडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गूळ धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने प्रशासनाने धरणाचे तीन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. गूळ मध्यम प्रकल्प उपविभाग आणि जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. ३१ जुलै २०२६) रोजी दुपारी ३ वाजता गूळ धरणाचे तीन दरवाजे प्रत्येकी ०.२५ मीटर उंचीने उघडण्यात येणार असून सुरुवातीला २,५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. पुढील काही तासांत पाण्याचा विसर्ग ३,००० ते ४,००० क्युसेक्सपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प :- मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गोरगावले बुद्रुक–गोरगावले खुर्द या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी वळण रस्ता खचून बंद झाला आहे.

अमळनेर तालुक्यातील देवळी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने चोपड्याकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. 


गरताड–कुरवेल मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

होळनांथे (शिरपूर)–मोहिदा (चोपडा) दरम्यानच्या पुलाजवळ पाण्याची पातळी वाढल्याने स्थानिकांनी खबरदारी म्हणून मार्ग बंद ठेवला आहे.

चोपडा शहरातील रत्नावती नदीला २००६ नंतर प्रथमच पूर आल्याने नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे.

दरम्यान, चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावर झाडे पडल्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती. मात्र संबंधित यंत्रणांनी झाडे हटवून रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला आहे.

तालुक्यात दमदार पर्जन्यवृष्टी

दि. ३० जुलै २०२६ रोजी चोपडा तालुक्यात पुढीलप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे:

चोपडा – १३५ मि.मी.

अडावद – १४० मि.मी.

धानोरा – १३० मि.मी.

हातेड – ६३ मि.मी.

लासूर – ८५ मि.मी.

चहार्डी – १४० मि.मी.

गोरगावले – १२० मि.मी.

तालुक्यात एकूण ८१३ मि.मी. पर्जन्यमान नोंदविण्यात आले असून सरासरी पर्जन्यमान ११६.१४ मि.मी. तर एकूण प्रगतीशील (Progressive) पर्जन्यमान ३३७.९१ मि.मी. इतके झाले आहे.

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे, तसेच नदी, नाले आणि पुलांजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

No comments