अडावदच्या शामराव येशो महाजन विद्यालयात पोलिसांचा जनजागृती उपक्रम 'सायबर क्राईम' व मुलींच्या सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मा...
रविंद्र कोळी अडावद / धानोरा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद, दि. ३१ जुलै : अडावद पोलीस ठाण्याच्या वतीने अडावद येथील शामराव येशो महाजन विद्यालयात 'सायबर क्राईम' (संगणकीय व मोबाईलद्वारे होणारे गुन्हे) तसेच 'मुलींची सुरक्षितता व कायदेशीर हक्क' या विषयांवर जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२.३० ते १.३५ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील (चोपडा विभाग), सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे (अडावद पोलीस ठाणे) आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या मराठे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियाचा गैरवापर, अनोळखी लिंक व फोन कॉलद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 'गुड टच – बॅड टच', बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO Act) तसेच महिला संरक्षणासंदर्भातील विविध कायद्यांची माहिती देण्यात आली. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ११२ (आपत्कालीन सेवा) आणि १९३० (सायबर हेल्पलाईन) या क्रमांकांवर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.
यावेळी शाळा परिसरात मुलींची छेडछाड, टवाळखोरी अथवा कोणत्याही प्रकारचे असभ्य वर्तन सहन केले जाणार नसून अशा प्रकारांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी अडावद पोलीस ठाण्याच्या वतीने पालक व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवण्याचे, तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या समाजकंटकांवर अडावद पोलिसांची करडी नजर असून अशा अपप्रवृत्तींविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.


No comments