जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेचे यश! पुनखेडे जि.प. प्राथमिक शाळेचा प्रणव सपकाळे शिष्यवृत्ती परीक्षेत चमकला पुनखेडे, ता. रावेर (प्रतिनिधी): ग्...
जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेचे यश!
पुनखेडे जि.प. प्राथमिक शाळेचा प्रणव सपकाळे शिष्यवृत्ती परीक्षेत चमकला
पुनखेडे, ता. रावेर (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील मर्यादित शैक्षणिक सुविधा, मार्गदर्शनाचा अभाव आणि कोणत्याही खाजगी शिकवणीची मदत नसतानाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुनखेडे (ता. रावेर) येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी प्रणव ललित सपकाळे याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून गावासह शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नुकताच इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. पुनखेडे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील एकूण १३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी प्रणव सपकाळे याने ३०० पैकी १३० गुण मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, शाळेतील काही विद्यार्थी अवघ्या १ ते २ गुणांनी पात्रतेपासून वंचित राहिले.
या यशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शैक्षणिक वर्षभर शाळेत जितेंद्र गवळी हे एकमेव शिक्षक म्हणून कार्यरत होते. मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, सर्व वर्गांचे अध्यापन, प्रशासकीय कामकाज आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन केले. त्यांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि नियोजनामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पाटील म्हणाले, "एकाच शिक्षकाने संपूर्ण शाळेची जबाबदारी सांभाळत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सक्षमपणे तयार केले. त्यांच्या तळमळीचे आणि मेहनतीचे हे यश म्हणजे जिवंत उदाहरण असून, शिक्षक जितेंद्र गवळी यांच्या कार्याला मिळालेली ही मोठी पावती आहे."
प्रणव सपकाळे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पुनखेडे गावाच्या शैक्षणिक लौकिकात मोलाची भर पडली आहे. या यशाबद्दल रावेरचे गटशिक्षणाधिकारी रविंद्र बखाल, केंद्र समन्वयक प्रकाश महाजन, ग्रामपंचायत सरपंच कीर्ती पाटील, उपसरपंच डिगंबर बोरसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष भगवान बोरसे, मुख्याध्यापक छगन पाटील, वर्गशिक्षक जितेंद्र गवळी, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य, उत्तर महाराष्ट्र संघटक, दैनिक लोकशाहीचे प्रतिनिधी व श्रद्धा सबुरी बुट हाऊसचे संचालक मा. श्री. विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई G) यांनी प्रणवचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्रणव हा मा. श्री. विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई G) यांचा पुतण्या असून, त्याच्या या यशाबद्दल गावातील पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.


No comments