जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीसांकडून 'विश्वासाची लेन्स' छायाचित्र स्पर्धेचे आयोजन पत्रकारांना सहभागाचे आवाहन; १२...
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीसांकडून 'विश्वासाची लेन्स' छायाचित्र स्पर्धेचे आयोजन
पत्रकारांना सहभागाचे आवाहन; १२ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका स्वीकारणार
जळगाव प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
१९ ऑगस्ट 'जागतिक छायाचित्रण दिना'चे औचित्य साधून जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने "विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार–जनता भागीदारी छायाचित्र स्पर्धा" आयोजित करण्यात आली आहे. पोलीस, पत्रकार आणि नागरिक यांच्यातील विश्वास, सहकार्य व सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पत्रकारांसाठी या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
छायाचित्र हे केवळ एक चित्र नसून समाजातील वास्तव, भावना, संघर्ष, सेवा, कर्तव्य आणि प्रेरणा यांचे प्रभावी दस्तऐवजीकरण असते. पत्रकार आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार ठरत असतात आणि त्या क्षणांना इतिहासात जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्याबरोबरच समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या छायाचित्रांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
स्पर्धेसाठी पोलिस इन पब्लिक सर्व्हिस, क्राईम, सोशल, ट्रॅफिक, जळगाव हेरिटेज, स्पोर्ट्स आणि वुमन एम्पॉवरमेंट या सात विभागांमध्ये छायाचित्रे मागविण्यात आली आहेत. इच्छुक पत्रकारांनी आपली छायाचित्रे १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत व्हॉट्सअॅप क्रमांक ९७०२२००३१५ वर पाठवावीत. प्राप्त झालेली निवडक छायाचित्रे मोठ्या आकारात मुद्रित करून १५ ऑगस्ट रोजी पद्मालय हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे आयोजित प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील प्रत्येक सातही विभागांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय असे प्रत्येकी तीन पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, पुरस्कारांचे वितरण जळगाव जिल्ह्याचे मान्यवर मंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग, सेवाभाव, पोलीस–पत्रकार–जनता यांच्यातील विश्वासाचे नाते आणि समाजहिताचे विविध पैलू प्रभावीपणे मांडणारी छायाचित्रे समोर यावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग आणि पोलीस–जनता सहकार्याचे प्रभावी दर्शन घडविण्याचे आवाहन केले आहे.

No comments