मानसिक असंतुलित महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन आरोपींना अडावद पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक पीडितेला दारू पाजून नाल्याकडे नेले; भारतीय न्य...
मानसिक असंतुलित महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन आरोपींना अडावद पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक
पीडितेला दारू पाजून नाल्याकडे नेले; भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल, न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी
![]() |
| Ai निर्मित काल्पनिक फाईल फोटो |
अडावद प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानसिक असंतुलित महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात अडावद पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. दि. १६ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत दोन्ही आरोपींनी तिला जबरदस्तीने मद्य पाजले. त्यानंतर दुचाकीवर बसवून एका नाल्याजवळ नेले आणि तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घरी परतल्यानंतर पीडित महिलेने आपल्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर फिर्यादी यांनी अडावद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी तात्काळ पथक रवाना करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर क्रमांक १४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६३(५), ६४ आणि ७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे करीत आहेत.
टीप : लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर व नैतिक कारणास्तव पीडितेची ओळख उघड केली जात नाही.

No comments