पाऊस धो धो पडत होता,निळं वादळ थांबल नाही.निलंग्यात आरक्षण विरोधात विशाल मोर्चा..!! लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गाय...
पाऊस धो धो पडत होता,निळं वादळ थांबल नाही.निलंग्यात आरक्षण विरोधात विशाल मोर्चा..!!
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गुरुवारी सकाळपासूनच निलंग्याच्या आभाळाने काळी चादर पांघरली होती. विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट सुरू होता आणि काही क्षणांतच मुसळधार पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहू लागले, झाडांच्या फांद्या वाऱ्याच्या झोक्याने डोलू लागल्या आणि सर्वसामान्य नागरिक पावसापासून बचावासाठी आसरा शोधत होते. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत निलंग्याच्या रस्त्यांवर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. अंगावर कोसळणाऱ्या पावसाच्या धारांना न जुमानता, हातात निळे झेंडे, ओठांवर जयभीमच्या घोषणा आणि मनात भारतीय संविधानावरील अढळ विश्वास घेऊन महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. अनेकांच्या अंगावर रेनकोट नव्हते, काहींच्या हातात छत्रीही नव्हती; तरीही त्यांच्या पावलांमध्ये कुठेही संकोच नव्हता. मुसळधार पावसातही शांततेने, शिस्तबद्धपणे आणि घटनात्मक मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा निर्धार या मोर्चातून प्रकर्षाने दिसून आला. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, निलंगा यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा प्रतिकूल परिस्थितीतही घटनात्मक हक्कांविषयीची भूमिका नोंदविणारा आणि लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास अधोरेखित करणारा ठरला.
मोर्चाची सुरुवात कासारशिरसी रोड येथून झाली.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे शहरातील प्रमुख रस्त्यांवरून शिस्तबद्ध मार्गक्रमण करत मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पोहोचला. मुसळधार पावसातही घोषणांचा आवाज अखंड सुरू होता. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झालेल्या सभेत उपस्थितांनी शासनाने अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.
यानंतर उपविभागीय अधिकारी, निलंगा यांच्या मार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्यात येऊ नये, न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल फेटाळण्यात यावा, आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी करून सर्व रिक्त आरक्षित पदे तातडीने भरावीत, अनुशेष भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी, डी-रिझर्व्हेशन प्रक्रिया तात्काळ थांबवावी, शिक्षण, शिष्यवृत्ती आणि संशोधनाच्या संधी वाढवाव्यात, खाजगी व सहकार क्षेत्रासह खाजगी अभिमत विद्यापीठांमध्ये आरक्षण धोरण लागू करावे, अनुसूचित जातींसाठी लागू करण्यात आलेली क्रिमिलेअरची अट रद्द करावी तसेच बार्टीमधील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पूर्वीचा कोटा कायम ठेवावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच संविधानातील सामाजिक न्यायाच्या तत्त्वानुसार अनुसूचित जातींचे हक्क अबाधित ठेवावेत, शासकीय, निमशासकीय, विद्यापीठे आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व रिक्त आरक्षित पदे तातडीने भरावीत, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश करण्यात आला. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
भर पावसातही मोर्चातील सहभागींचा उत्साह अखेरपर्यंत कायम राहिला. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत घोषणांचा आवाज अधिक बुलंद होत होता. अनेक कुटुंबांनी आपल्या लहान मुलांसह सहभाग घेतला, तर ज्येष्ठ नागरिकांनीही शेवटपर्यंत मोर्चात चालत आपली उपस्थिती नोंदवली. प्रतिकूल हवामान असूनही शांतता, शिस्त आणि मोठ्या जनसहभागामुळे हा मोर्चा निलंग्यातील अलीकडच्या काळातील लक्षवेधी आंदोलनांपैकी एक ठरल्याची चर्चा दिवसभर शहरात होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मोर्चाची शांततेत सांगता झाली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते विलास सूर्यवंशी, रजनीकांत कांबळे,रोहित बनसोडे, अंकुश ढेरे, धम्मानंद कोळे, सतीश कांबळे, डॉ. प्रमोद हातागळे, अर्जुनप्पा कटके, विजयकुमार सूर्यवंशी, रामलिंग पटसाळगे, दिगंबर सूर्यवंशी, देवदत्त सूर्यवंशी, दाजीबा कांबळे, बन्टी कांबळे, देविदास धैर्य, अंकुश कांबळे, अशोक कांबळे, लहू ढेरे, सूर्यकांत कांबळे, अंगद गवळी, प्रदीप सोनकांबळे, अमोल सोनकांबळे, योगेश सूर्यवंशी, खंडू मादळे, अनंत कांबळे, विलास वाघमोडे, उल्हास वाघमोडे, लक्ष्मण कांबळे, भगवान कांबळे, लक्ष्मण वडगावकर, अंगद कांबळे, संजय सोनकांबळे, तानाजी सुरवसे, काशिनाथ जाधव, प्रकाश कांबळे, स्वप्नील कांबळे, जयभीम गायकवाड, अनिल कांबळे, राहुल मोरे, सुभाष कांबळे, मलिंग गोपाळे, सुनील गायकवाड, माधव लांडगे, धनराज बनसोडे, देविदास पतंगे, भीमराव सूर्यवंशी, वसंत गायकवाड, युवराज जोगी, बालाजी कांबळे, धनराज कांबळे, बाबासाहेब कांबळे, तानाजी गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments