जाचक अटी रद्द करून कर्जमाफीचा निर्णय; सरकारचे शेतकऱ्यांकडून आभार, केळी उत्पादकांना तातडीने नुकसानभरपाई व पीकविमा देण्याची मागणी प्रतिनिधी ...
जाचक अटी रद्द करून कर्जमाफीचा निर्णय; सरकारचे शेतकऱ्यांकडून आभार, केळी उत्पादकांना तातडीने नुकसानभरपाई व पीकविमा देण्याची मागणी
प्रतिनिधी : अंतुर्ली / मुक्ताईनगर किरण धायले
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी अखेर राज्य शासनाने रद्द करून कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल शेतकरी व विविध शेतकरी संघटनांनी समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत.
मागील काही वर्षांत अतिवृष्टी, दुष्काळ, शेतमालाला मिळालेले कमी बाजारभाव, वाढती महागाई तसेच खते, बियाणे व औषधांच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने विनाअट सरसकट कर्जमाफी करणे आवश्यक असताना योजनेत अनेक जाचक अटी व शर्ती घालण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.
या जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी आमदार रोहित राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर व छत्रपती संभाजीनगर येथे मोठी आंदोलने करण्यात आली होती. तसेच विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकरी बांधवांनी एकजुटीने या लढ्यात सहभाग घेतला. शासनाने अखेर जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गाने आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले असून या लढ्यात सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान, मे व जून २०२६ मध्ये वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या केळी बागायतदार शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच पीक विमा कंपन्यांकडून होत असलेल्या दिरंगाई व अडचणी थांबवून केळी उत्पादक शेतकऱ्यांना विनाअट व विनाशर्त पीकविम्याची रक्कम त्वरित मंजूर करून त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या VJNT विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले, शेख भैय्या शेख करीम आणि किरण धायले यांनी केली आहे.

No comments