प्रहारच्या इशाऱ्याची न.प.ने घेतली तात्काळ दखल; मलकापूर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या...
प्रहारच्या इशाऱ्याची न.प.ने घेतली तात्काळ दखल; मलकापूर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामास प्रारंभ
जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या निवेदनानंतर प्रशासनाची तत्काळ कारवाई; खडी व चुरी टाकून तात्पुरत्या दुरुस्तीला सुरुवात
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी ३० जून रोजी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. तसेच सात दिवसांत खड्डे न बुजविल्यास खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावून त्यांचे नामकरण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला होता.
या निवेदनाची नगर परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेत १ जुलैपासून शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. यासाठी आवश्यक खडी व चुरी विविध ठिकाणी टाकण्यात आली असून तात्पुरत्या स्वरूपात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक अंतर्गत मार्गांवर लहान-मोठे खड्डे पडल्याने पादचारी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचाऱ्यांच्या अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता.
या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने तत्परता दाखवत खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रहार संघटनेने घेतलेल्या पुढाकारामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले असून यामुळे नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

No comments