adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

७ दिवसांत उपजिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवा; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन – ॲड. अमोल भाऊ अंधारे

 ७ दिवसांत उपजिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवा; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन – ॲड. अमोल भाऊ अंधारे  पल्लवी पाटील खामगाव (संपादक : हेमकांत गाय...

 ७ दिवसांत उपजिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवा; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन – ॲड. अमोल भाऊ अंधारे 


पल्लवी पाटील खामगाव

(संपादक : हेमकांत गायकवाड)

खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील अपुऱ्या आरोग्य सुविधा, रुग्णांची होणारी गैरसोय आणि मूलभूत सेवांतील त्रुटींविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. रुग्णालयातील विविध समस्या तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी शिवसेना खामगाव विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना सात कलमी निवेदन सादर केले.

निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. अमोल भाऊ अंधारे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील मूलभूत समस्या पुढील सात दिवसांत मार्गी लावून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा शिवसेना आपल्या आक्रमक शैलीत तीव्र आंदोलन छेडेल आणि त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.

निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :

  • रुग्णालयात तातडीने सोनोग्राफी सेवा सुरू करून कायमस्वरूपी रेडिओलॉजिस्टची नियुक्ती करावी.
  • सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून रुग्णांना तत्पर सेवा द्यावी.
  • किरकोळ कारणांवरून रुग्णांना अकोला येथे रेफर करण्याची पद्धत बंद करून शक्य तितके उपचार स्थानिक रुग्णालयातच उपलब्ध करून द्यावेत.
  • रुग्णालयातील सर्व वॉर्ड व परिसराची नियमित व प्रभावी स्वच्छता राखून संसर्गाचा धोका टाळावा.
  • डिलिव्हरी वॉर्डमधील नर्सिंग स्टाफकडून रुग्ण व नातेवाईकांशी होणारी उद्धट वागणूक थांबवावी.
  • सिटी स्कॅन विभागातील कामकाजात पारदर्शकता आणून तपासणीचे अधिकृत दरपत्रक दर्शनी भागात लावावे.
  • रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणा, पंखे, विद्युत व्यवस्था व जनरेटरची सुविधा तातडीने सुरळीत करावी.

यावेळी ॲड. अमोल भाऊ अंधारे म्हणाले, "खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालय हे हजारो गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आशेचे केंद्र आहे. मात्र येथे डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसणे, आवश्यक तपासण्या न होणे आणि रुग्णांना वारंवार अकोल्याला रेफर केले जाणे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात."

या निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. अमोल भाऊ अंधारे, उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, गजानन उर्फ पिंटू धोरण, तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शहरप्रमुख चेतन ठोंबरे, युवासेना शहरप्रमुख राहुल कळमकार, महिला आघाडी तालुका प्रमुख संघटक सौ. जयश्री देशमुख, कल्पना गायगोळ, पल्लवी पाटील, उपशहर प्रमुख करण उर्फ भाऊ बिडकर, करण छापरवाल, जीवन जाधव, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख विक्की सरवान, वैद्यकीय आघाडी जिल्हा संघटक पियुष चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, वैद्यकीय अधीक्षकांनी निवेदनातील सर्व मागण्यांची नोंद घेत संबंधित बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

No comments