गुरुपौर्णिमेनिमित्त धरणगाव महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन; माजी विद्यार्थिनी रेखा पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन धरणगाव प्रतिनिध...
गुरुपौर्णिमेनिमित्त धरणगाव महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन; माजी विद्यार्थिनी रेखा पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गुरुपौर्णिमेनिमित्त दि. २९ जुलै २०२६ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव येथे विज्ञान मंडळाचे उद्घाटन तसेच इयत्ता ११ वीच्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या सन २००१ च्या बारावीच्या प्रथम क्रमांकाच्या माजी विद्यार्थिनी तथा श्री शिवाजी आदर्श प्राथमिक केंद्र शाळा, हातेड (ता. चोपडा) येथील उपशिक्षिका रेखा अशोक पाटील यांना प्रमुख वक्त्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना रेखा पाटील म्हणाल्या की, "ज्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आपण शिक्षण घेतले, घडलो आणि आज त्याच महाविद्यालयात गुरुपौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळणे, हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि भाग्याचे आहे."
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शैक्षणिक यशासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्याचे महत्त्व पटवून दिले. स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी वेळेचा योग्य उपयोग करावा, सातत्याने अभ्यास करावा तसेच मोबाईल, इंस्टाग्राम आणि विविध व्यसनांपासून दूर राहून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगताप होते. यावेळी विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या चौधरी मॅडम, पर्यवेक्षक अत्तरदे सर, विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा राखी पवार मॅडम, कांडेलकर सर, पाटील सर, महाजन मॅडम, महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments