जात वैधता प्रमाणपत्रे तात्काळ द्या; अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडू – राकेश सोनार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ थांबविण्याची मागणी; ...
जात वैधता प्रमाणपत्रे तात्काळ द्या; अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडू – राकेश सोनार
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ थांबविण्याची मागणी; राज्य जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांना निवेदन
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रमांतील प्रवेश तसेच शिष्यवृत्ती अर्ज जात वैधता प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे अडचणीत आले आहेत. शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन प्रलंबित जात वैधता प्रमाणपत्रांचे त्वरित वितरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी केली आहे.
यासंदर्भात राज्य जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांना निवेदन देण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी कोणत्याही प्रकारचा खेळ सहन केला जाणार नसल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यभर विविध व्यावसायिक व उच्च शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. मात्र, जात वैधता प्रमाणपत्रे प्रलंबित असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः परजिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करता येत नसल्याने त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच, दि. १३ ते २४ जुलै या कालावधीत जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याने प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशिक्षण काळात पर्यायी व्यवस्था करून सर्व प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा व विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी राकेश सोनार म्हणाले की, "विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. शासनाने तात्काळ प्रभावी उपाययोजना करून सर्व प्रलंबित जात वैधता प्रमाणपत्रे मंजूर करावीत. अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील."
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, विभागीय आयुक्त (नाशिक) तसेच जिल्हाधिकारी, जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सातत्याने भूमिका घेतली असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

No comments