धक्कादायक! लातूरच्या चांडेश्वर येथील डॉक्टर महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये आत्महत्या की घातपात? लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक -:- हे...
धक्कादायक! लातूरच्या चांडेश्वर येथील डॉक्टर महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये आत्महत्या की घातपात?
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पिंपरी-चिंचवड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील चांडेश्वर येथील डॉ. श्वेता तुलसिदास रोकडे या डॉक्टर महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इमारतीवरून पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात, याबाबत सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. श्वेता रोकडे या पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास होत्या आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होत्या. शांत, अभ्यासू आणि सेवाभावी स्वभावामुळे त्या परिचित होत्या. त्यामुळे त्यांच्या अचानक मृत्यूच्या बातमीने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, इमारतीवरून पडल्याची घटना घडल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्या, अपघात किंवा घातपात या तिन्ही शक्यतांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कौटुंबिक तणाव, मानसिक दबाव किंवा इतर काही कारण होते का, याचाही तपास सुरू आहे. पोलिसांकडून कुटुंबीय, नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.
विशेष म्हणजे डॉ. श्वेता रोकडे या आपल्या आई-वडिलांची एकुलती एक लेक होत्या. त्यामुळे या घटनेने रोकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चांडेश्वर गावातही शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. डॉ. श्वेता रोकडे यांच्या मृत्यूमागचे खरे कारण काय? हा आत्महत्येचा प्रकार आहे की यामागे काही वेगळे सत्य दडले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुढील अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments