अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक विम्याचे ट्रिगर पूर्ववत करा; शेतकरी कृती समितीची मुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांकडे मागणी वैयक्तिक पीक न...
अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिक विम्याचे ट्रिगर पूर्ववत करा; शेतकरी कृती समितीची मुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांकडे मागणी
वैयक्तिक पीक नुकसानीसाठीचे तीन ट्रिगर पुन्हा लागू करावेत; खरीप पिक विमा भरण्याची मुदत वाढविण्याचीही ई-मेलद्वारे मागणी
विश्राम तेले चौगाव/जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात काही भागांत कमी पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेतील पूर्वीचे ट्रिगर तातडीने पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री, कृषी सचिव व कृषी आयुक्त यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान पीक विमा योजनेत पूर्वी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीनंतरचे नुकसान आणि पीक कापणी प्रयोगांवर आधारित उत्पन्न घट असे चार महत्त्वाचे ट्रिगर अस्तित्वात होते. मात्र, 'एक रुपयात पीक विमा' योजना लागू केल्यानंतर वैयक्तिक नुकसानीशी संबंधित तीन ट्रिगर वगळण्यात आले असून, सध्या केवळ पीक कापणी प्रयोगांच्या (Crop Cutting Experiments) आकडेवारीच्या आधारेच नुकसानभरपाई दिली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप समितीने केला आहे.
समितीने पुढे म्हटले आहे की, ट्रिगरमध्ये बदल करताना शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी अतिरिक्त पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अपेक्षित निधी उपलब्ध झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारची भूमिका शेतकरीहिताच्या विरोधात असल्याची भावना शेतकरी वर्गात निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यंदा पावसाला उशीर होत असल्याने खरीप पेरणी उशिरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी खरीप पीक विमा भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या सर्व मागण्या मान्य करून अल निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने समन्वयक एस. बी. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी सचिव आणि कृषी आयुक्त यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
No comments