पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा; शाळकरी विद्यार्थ्यांची बस चिखलात अडकली, पिंप्री ग्रामस्थांचा संताप भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत ...
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा; शाळकरी विद्यार्थ्यांची बस चिखलात अडकली, पिंप्री ग्रामस्थांचा संताप
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पिंप्री (ता. यावल) गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांपासून दर्जेदार डांबरी रस्त्याची मागणी होत असताना नुकतीच करण्यात आलेली वरवरची डागडुजी पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे वास्तव समोर आले आहे.
शुक्रवारी सकाळी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रस्त्यातील चिखलात अडकली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे बसमधील विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांच्या मते, ही केवळ सुदैवाची बाब असून, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.
सध्या रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे, चिखलाचे साम्राज्य आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या नाल्यांचा व छोट्या पुलांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक साईड पट्ट्या नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे की, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मागील काही वर्षांत अनेक रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. रुग्णवाहिका वेळेत पोहोचण्यास अडथळे निर्माण झाल्याने काहींना जीव गमवावा लागल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीचा नसून मानवी जीवनाशी निगडित असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यानंतर अनेक दशके लोटली, विविध विकास योजना राबविण्यात आल्या; मात्र पिंप्री गावातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुजी न करता तांत्रिक निकषांनुसार दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे. तसेच रस्त्यालगत साईड पट्ट्या, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले आणि आवश्यक त्या ठिकाणी छोटे पूल उभारण्यात यावेत, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणा व प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
"विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा... पिंप्रीला सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता द्या," अशी आर्त मागणी आता संपूर्ण गावातून होत आहे.


No comments