अहिल्यानगरात खळबळ! कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसावर हल्ला;सोन्याची अंगठी हिसकावून चोरटा पसार सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत ग...
अहिल्यानगरात खळबळ! कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसावर हल्ला;सोन्याची अंगठी हिसकावून चोरटा पसार
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-शहरातील पंचपीर चावडी परिसरात एक धक्कादायक आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना समोर आली आहे.कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करत,एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण शहरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका जुन्या गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी या पंचपीर चावडी परिसरात गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्या आपले शासकीय कर्तव्य बजावत असताना आणि प्रकरणाचा तपास करत असताना, अचानक एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या दिशेने धावून आली.
काही समजण्याच्या आतच त्या व्यक्तीने महिला पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. महिला पोलिसाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला,मात्र चोरट्याने त्यांच्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी बळजबरीने ओढून काढली आणि घटनास्थळावरून धूम ठोकली.भरदिवसा आणि त्यातही पोलिसावरच झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेनंतर पीडित महिला कर्मचाऱ्याने तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या सर्व प्रकाराबाबत रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे चोरट्याचा कसून शोध घेतला जात आहे. पोलीस महिलेवरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

No comments