करवाढीच्या निषेधार्थ श्रीरामपूर कडकडीत बंद; वाढीव करपट्टीची होळी करत नागरिकांचा तीव्र संताप श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गा...
करवाढीच्या निषेधार्थ श्रीरामपूर कडकडीत बंद; वाढीव करपट्टीची होळी करत नागरिकांचा तीव्र संताप
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीरामपूर नगरपरिषदेने शहरातील घरमालक, गाळेधारक, व्यापारी तसेच व्यावसायिक आस्थापनांवर घरपट्टी, नळपट्टी आणि दुकानांवरील करामध्ये दुप्पट, तिप्पट, चौपट तर काही ठिकाणी पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ आज श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या बंदला शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि विविध राजकीय पक्षांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे ९० टक्के दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
शहरातील वाढीव कर आकारणीमुळे सर्वसामान्य नागरिक, घरमालक, लहान-मोठे व्यापारी आणि गाळेधारक आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नगरपरिषदेने नागरिकांशी कोणतीही सल्लामसलत न करता अन्यायकारक पद्धतीने करामध्ये मोठी वाढ केली असून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनाची सुरुवात शहरातील प्रमुख मार्गांवरून जनजागृती फेरी काढून करण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी पुतळा परिसरात सर्व आंदोलक एकत्र आले. यावेळी नगरपरिषदेच्या करवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
"अन्यायकारक करवाढ रद्द करा" श्रीरामपूरकरांवरील आर्थिक जुलूम बंद करा", "वाढीव करपट्टी मागे घ्या" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यानंतर आंदोलनकर्त्यांनी नगरपरिषदेने वाढविलेल्या करपट्टीच्या प्रतींची होळी करून आपल्या तीव्र संतापाला वाट मोकळी करून दिली. यावेळी आंदोलकांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत, करवाढीचा निर्णय त्वरित रद्द न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
या आंदोलनात रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन, मर्चंट असोसिएशनचे संचालक गौतम उपाध्ये, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, शहराध्यक्ष उमेश पवार, राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड, माजी नगरसेवक मुक्तार भाई शहा, मोहम्मद पोपटिया, बाळासाहेब चांडवले, सतीश कुंकूलोळ, रमीज पोपटिया पत्रकार दिपक कदम यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील विविध भागात फिरून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला भक्कम पाठिंबा दिला. त्यामुळे शहरातील बहुतांश बाजारपेठा दिवसभर शांत दिसून आल्या आणि बंदला मोठे यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आंदोलनाच्या शेवटी सुभाष दादा त्रिभुवन यांनी श्रीरामपूर शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिक, नागरिक तसेच विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, नागरिकांवर अन्याय करणारी ही करवाढ तातडीने मागे घेतली नाही तर आगामी काळात आणखी व्यापक आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल. श्रीरामपूरकरांच्या हक्कांसाठी हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला,श्रीरामपूर बंद ला मर्चंट असोसिएशन, भाजपा आदींनी पाठिंबा दिला होता.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111

No comments