अहिल्यानगरमध्ये भल्यामोठ्या तिरट जुगार अड्ड्यावर LCB चा छापा तब्बल पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त! ६ आरोपी अटकेत तर २ फरार! सचिन मोकळं अह...
अहिल्यानगरमध्ये भल्यामोठ्या तिरट जुगार अड्ड्यावर LCB चा छापा तब्बल पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त! ६ आरोपी अटकेत तर २ फरार!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी आता कंबर कसली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात सुरू असलेल्या एका मोठ्या तिरट जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकून दणकेबाज कारवाई केली आहे.या कारवाईत पोलिसांनी ६ आरोपींना जागीच बेड्या ठोकल्या असून मोबाईल, वाहने आणि रोख रकमेसह तब्बल ३,६९,९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.त्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक गठीत करण्यात आले होते.
दि.२१ जुलै २०२६ रोजी हे पथक नगर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना,कामरगाव शिवारातील एका ताडपत्रीच्या शेडमध्ये काही इसम पैशांची हार-जीत लावून तिरट नावाचा जुगार खेळत आणि खेळवत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.माहिती मिळताच पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांना अचानक समोर पाहून जुगारींमध्ये प्रचंड घबराट पसरली व त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला.यात एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला,मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखून चंद्रभान जयसिंग खोडवे (वय ४५, रा. कामरगाव,अहिल्यानगर),सोहम संदीप भिंगारदिवे (वय २१, रा.कामरगाव,अहिल्यानगर),भाऊसाहेब जनार्धन ठोकळ (वय ५५, रा.कामरगाव, अहिल्यानगर),मनोज नाना झरेकर (वय ४१, रा. कामरगाव,अहिल्यानगर),किरण शाम भालके (वय ३५, रा. पिंपळगाव पिसा,ता.श्रीगोंदा),शिवाजी दत्तात्रय दिवेकर (वय ४४, रा. यशवंत कॉलनी, शिरूर, जि. पुणे) यांना पकडले.पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता,पळून गेलेल्या आरोपीचे नाव चंद्रकांत नागनाथ दांदेवाड (रा. केडगाव,अहिल्यानगर) असल्याचे समोर आले आहे. तसेच हा जुगार अड्डा गोरक्ष दिलीप कातोरे (रा.कामरगाव) हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले असून,पोलीस आता या दोघांचाही तीव्रतेने शोध घेत आहेत.कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम, किमती मोबाईल फोन आणि वाहने असा एकूण ३,६९,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६२८/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.संतोष मुटकुळे, पोउपनि.कृष्णकुमार सेदवाड,पोलीस अंमलदार विष्णु भागवत,विजय पवार, सोमनाथ झांबरे,भिमराज खर्से,प्रकाश मांडगे,भगवान धुळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments