शेअर मार्केट घोटाळ्याला भयंकर वळण! तपासाच्या नावाखाली 'मोठा खेळ' आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार दिनेश राठोड निलंबित..! सचिन...
शेअर मार्केट घोटाळ्याला भयंकर वळण! तपासाच्या नावाखाली 'मोठा खेळ' आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार दिनेश राठोड निलंबित..!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- राज्यभरात प्रचंड गाजलेल्या शेवगाव येथील बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या शेअर मार्केट घोटाळ्याच्या तपासात एक धक्कादायक आणि पोलीस दलाला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे.या घोटाळ्यातील फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनाच आरोपी करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपांवरून आर्थिक गुन्हे शाखेतील (EOW) पोलीस अंमलदार दिनेश राठोड यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मंगळवारी (२१ जुलै) रात्री उशिरा हे निलंबनाचे आदेश काढल्याने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.शेवगाव येथे जादा परताव्याचे (हाय रिटर्न) आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली होती.याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या गुन्ह्यांची व्याप्ती आणि रक्कमेचा आकडा प्रचंड मोठा असल्याने या तपासाची सूत्रे जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आली होती.गुंतवणूकदारांना आपले बुडालेले पैसे परत मिळतील अशी आशा होती;मात्र, तपासाच्या नावाखाली खाकी वर्दीतूनच पैशांची उघड उकळपुकळ सुरू असल्याचे भीषण वास्तव समोर आले.
तक्रारदार गुंतवणूकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेतील अंमलदार दिनेश राठोड त्यांना तपासाच्या नावाखाली सतत नोटिसा पाठवून बोलावून घेत होता.त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी आणि "तुम्हालाही या गुन्ह्यात सह-आरोपी केले जाईल," अशी थेट भीती दाखवून त्यांच्याकडे वारंवार व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधत होता. स्वतःसाठी तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने त्याने गुंतवणूकदारांकडे लाखो रुपयांच्या लाचेची मागणी केली.गुंतवणूकदारांनी या छळाला कंटाळून थेट पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे पुराव्यानिशी लेखी तक्रार नोंदवली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले.अप्पर पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात अंमलदार दिनेश राठोड यांच्यावरील आरोप प्रथमदर्शनी अत्यंत गंभीर व तथ्याधारित असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मंगळवारी रात्रीच राठोडच्या निलंबनाचे आदेश जारी केला.अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही काळात आर्थिक फसवणुकीचे अनेक मोठे रॅकेट उघडकीस आले आहेत.या सर्व गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडेच आहे.मात्र,ज्या यंत्रणेवर न्यायाची जबाबदारी आहे,तीच यंत्रणा जर पीडित गुंतवणूकदारांना लुबाडणार असेल,तर न्याय मागायचा कोणाकडे? असा उद्विग्न सवाल आता नागरिक विचारत आहेत.या घटनेमुळे 'ईओडब्ल्यू'च्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान,या प्रकरणात केवळ निलंबन पुरेसे नसून संशयित अंमलदारावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता गुंतवणूकदारांमधून केली जात आहे.

No comments