मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन दिमाखात साजरा "शिक्षण हेच खरे राष्ट्रसेवेचे साधन" - डॉ. सी. एस. चौधरी प्...
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन दिमाखात साजरा
"शिक्षण हेच खरे राष्ट्रसेवेचे साधन" - डॉ. सी. एस. चौधरी
प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर | श्रावण शुद्ध नाग पंचमी या पवित्र दिनी म्हणजे 2 ऑगस्ट 1946 साली केवळ सात विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या एदलाबाद तालुका एज्युकेशन सोसायटीने आज 81 वर्षांचा सुवर्णमय प्रवास पूर्ण केला. आज याच संस्थेने "मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी" या नावाने जिल्ह्यातील अग्रेसर शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक मिळविले आहे.
जे. ई. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे संस्थेचा 81 वा वर्धापन दिन सांस्कृतिक कार्यक्रमांसह आणि मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एस आर ठाकूर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष मा.डॉ. सी. एस. चौधरी तथा प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष मा.नारायण दादा चौधरी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन झाले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. डी. पाटील यांनी केले त्यांनी सांगीतले की याच नाग पंचमीच्या दिवशी एका विचारातून उगवलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. नवीन माध्यमिक विद्यालय निमखेडी, एम. एम. नारखेडे विद्यालय रुइखेडा, जे. ई. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, ग. सु. वराडे आय. टी. आय., खडसे कॉलेज, सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यालय आणि कृषी विद्यालय या सारख्या विद्या
शाखांमधून आज 5000 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या संस्थेतून घडलेले हजारो विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक म्हणून समाजसेवा करत आहेत.प्राचार्यां व्ही. एम. चौधरी यांनी संस्थेचा सविस्तर लेखाजोखा सादर केला.संस्थेच्या या विविध शाखांमधून सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे.आम्ही केवळ अभ्यासक्रम शिकवत नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत. डिजिटल क्लासरूम, करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास असे उपक्रम आम्ही राबवत आहोत. पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे कष्ट यामुळेच आज संस्था या उंचीवर पोहोचली आहे. यापुढेही आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा वसा कायम ठेवू.असा विश्वास त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
संस्थेचे सचिव डॉ. सी. एस. चौधरी आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले,आजचा दिवस केवळ वर्धापन दिन नाही तर हा आत्मपरीक्षणाचा आणि संकल्पाचा दिवस आहे. 1946 साली आमच्या काही दिवंगत अध्यक्ष तथा संचालक यांनी शिक्षणाच्या एका दिव्याने सुरुवात केली. आज तो दिवा हजारो घरांमध्ये उजळत आहे. शिक्षण हेच खरे राष्ट्रसेवेचे साधन आहे. माझ्या विद्यार्थ्यांनो, तुम्ही फक्त गुणांसाठी शिकू नका. चारित्र्य, शिस्त, देशभक्ती आणि माणुसकी हे गुणही आत्मसात करा. तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा मोठी आहे, पण आमची संस्था तुम्हाला केवळ नोकरीसाठी नाही तर आयुष्यासाठी तयार करेल.आमचे ध्येय एकच आहे की गुणवत्तापूर्ण विद्यार्थी व एक आदर्श नागरिक घडवणे. तसेच यावेळी उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष नारायण दादा चौधरी यांनी सुद्धा सर्वांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सर्वेसर्वा मा. एकनाथराव खडसे तथा अध्यक्षा मा. अॅड. रोहिणी खडसे आणि सर्व संचालक मंडळाने व्हिडिओ संदेशाद्वारे विद्यार्थी आणि सर्व शिक्षक बंधू-भगिनींना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी केक कापण्यात आला. विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. मुलांनी जल्लोष करत लोक गीतांवर नृत्य सादर करून वातावरण भारून टाकले.यावेळी पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे, एस. एम. वाढे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.श्रावण शुद्ध नाग पंचमी निमित्त डी एन खडसे यांनी सापाविषयीचे समज गैरसमज याविषयी माहिती दिली सूत्रसंचालक एस. आर. ठाकूर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


No comments