जीवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा : आ. अमोल जावळे इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील लक्ष्मी ...
जीवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा : आ. अमोल जावळे
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन आ. अमोल जावळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे चेअरमन नरेंद्रभाऊ नारखेडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी बबनराव काकडे, माजी आमदार अरुणदादा पाटील, तंत्र व वैदिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय साध्य करण्यासाठी विविध विचारधारा असलेले साहित्य वाचून ज्ञान संपादन करावे, तसेच प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याची मनोवृत्ती ठेवावी, असा मोलाचा सल्ला दिला.
वन प्रशिक्षण केंद्राचे संचालक हेमंतजी शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धात्मक वृत्ती, चपळता, नवनिर्मिती, एकमेकांना सहकार्य, तडजोड आणि शेवटी सहकाराचे तत्त्व या जीवनातील महत्त्वपूर्ण बाबींचे सविस्तर विवेचन केले.
यावेळी माजी आमदार अरुण पाटील व शरद महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे व स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर
याच कार्यक्रमादरम्यान लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील पार पडली. यावेळी संस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
कार्यक्रमास प्राचार्य के. जी. पाटील, प्रदीप राणे, व्ही. आर. पाटील, आर. एल. चौधरी, शेतकी संघ संचालक धनंजय फिरके, हर्षद महाजन, चंद्रशेखर चौधरी, कमलाकर भंगाळे, पंडित कोल्हे, संचालक अनिल नारखेडे, अप्पा चौधरी, सुरेश परदेशी, डॉ. गणेश चौधरी, बंडू माहुरकर, लतिका बोंडे, रेवती पाटील, सुनील नारखेडे, नायब तहसीलदार गुरव, किरण चौधरी, अतुल तलेले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक महेंद्र वायकोळे, शेखर चौधरी, किशोर बरहाटे, राजू मिस्त्री व राजेंद्र मानेकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार व्हाईस चेअरमन मनोजकुमार पाटील यांनी मानले.

No comments