संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे थाटात उद्घाटन; ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यास प्रशासनाचे आश्वासन इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपुर (संपादक -:...
संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे थाटात उद्घाटन; ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यास प्रशासनाचे आश्वासन
इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव, येथे शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या संजीवन ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या शासकीय नोंदणीनंतर मंडळाचे उद्घाटन गुरुवारी (दि. ३०) सैनिक कल्याण सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या उद्घाटन सोहळ्यास जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे तसेच नगरसेविका ॲड. सुचिता हाडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर मंडळाच्या संचालकांनी मान्यवरांचे स्वागत केले. मंडळाच्या लोगो असलेल्या फलकाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात मंडळाचे सचिव प्रकाश बारी यांनी मंडळ स्थापनेमागील उद्दिष्टे, प्रेरणा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण हितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निवृत्त शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही दिली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करत आवश्यक मार्गदर्शन केले.
महापौर दीपमाला काळे यांनी ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक असून त्यांच्या अनुभवातूनच आजची पिढी घडली असल्याचे सांगितले. प्रत्येक ज्येष्ठाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार राजू मामा भोळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण कायम तत्पर राहू, अशी ग्वाही देत "ज्येष्ठांची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे," असे सांगितले. नगरसेविका ॲड. सुचिता हाडा यांनी मंडळाच्या "स्वतःसाठी जगा" या ब्रीदवाक्याचे कौतुक करत, निवृत्तीनंतर प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्य, आनंद आणि सामाजिक सहभागासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात मंडळाच्या नावाचा, लोगोचा व ब्रीदवाक्यामागील अर्थ उलगडून सांगितला. मंडळाच्या कार्यावर आधारित त्यांनी सादर केलेल्या कवितेने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रश्मी कुरंभट्टी यांनी केले, तर ॲड. कैलास सोनार यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उल्हास चौधरी, सुनील नेमाडे, दीपक तांबोळी, प्रकाश चौधरी, यशवंत चिरमाडे, रवींद्र कांडेलकर, सौ. इंदिरा जाधव, सौ. पुष्पा जाधव तसेच सर्व संचालक व सभासदांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments