अडावद पोलीस ठाण्यात वरगव्हाणच्या विद्यार्थिनींनी बांधल्या पोलिस बांधवांना राख्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने जनरक्षक पोलिसांप्रती व्यक्त केल...
अडावद पोलीस ठाण्यात वरगव्हाणच्या विद्यार्थिनींनी बांधल्या पोलिस बांधवांना राख्या
रक्षाबंधनाच्या निमित्ताने जनरक्षक पोलिसांप्रती व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव 
रविंद्र कोळी अडावद
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद, ता. चोपडा : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून वरगव्हाण येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी अडावद पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा अनोखा व भावनिक कार्यक्रम साजरा केला.
यावेळी अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत कंडारे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांना विद्यार्थिनींनी राखी बांधत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अडावद ता. चोपडा येथील पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत कंडारे यांना विद्यार्थिनी राखी बांधताना. शेजारी मुख्याध्यापक श्री. सुधीर चौधरी सर व आदी मान्यवर.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, वरगव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, गावातील मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थिनींनी पोलिस बांधवांना राखी बांधून समाजाचे संरक्षण करण्याची भावना अधिक दृढ व्हावी, असा संदेश दिला. यावेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पोलिस कर्मचाऱ्यांप्रती असलेला जिव्हाळा पाहायला मिळाला.
दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थिनींनी पोलीस प्रशासन, कायदा-सुव्यवस्था व संरक्षण यंत्रणेबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. तसेच विद्यार्थिनींनी नियमित अभ्यास करून चांगले शिक्षण घेत जीवनात मोठे ध्येय गाठावे, अशा शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यस्त कर्तव्याच्या वेळापत्रकातून वेळ देत विद्यार्थिनींशी हितगुज केल्याने विद्यार्थ्यांमध्येही मोठा उत्साह निर्माण झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन पवार यांनी केले, तर मुख्याध्यापक श्री. सुधीर चौधरी सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी सहकार्य केले.
No comments