रक्षाताई खडसे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा मुक्ताईनगरात तीव्र निषेध; तहसील कार्यालयावर भाजपाचा मोर्चा किरण धायले मुक्ताईनगर (संपादक ...
रक्षाताई खडसे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा मुक्ताईनगरात तीव्र निषेध; तहसील कार्यालयावर भाजपाचा मोर्चा
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर, : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा भारत सरकारच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेल्या अश्लील, आक्षेपार्ह व मानहानीकारक वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर यांना निवेदन सादर करून संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, नंदुरबार येथील विजय चौधरी या व्यक्तीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी अत्यंत अश्लील, अवमानकारक व बदनामीकारक भाषा वापरल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारचे वक्तव्य हे केवळ एका लोकप्रतिनिधीचा अपमान नसून सार्वजनिक जीवनात कार्यरत महिलांच्या सन्मानाला धक्का देणारे असून समाजात चुकीचा संदेश देणारे असल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रक्षाताई खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील लाखो नागरिकांच्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याविषयी करण्यात आलेल्या अशोभनीय वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत. अशा विकृत व समाजविघातक प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
या मोर्चात भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र सवळे, अतुल महाजन, पंकज कोळी, जिल्हा सदस्य चंद्रकांत भोलाणे, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख ललित महाजन, डॉ. प्रविण पाचपांडे, सचिन पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष तथा नगरसेविका माधुरी सचिन पाटील, तालुका उपाध्यक्ष कैलास वंजारी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विशाल झाल्टे, नगरसेविका साधना ससाणे, नगरसेवक नईम बागवान, सागर गंगतीरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाडी-सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.

No comments