adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण जखमी; वनविभागाच्या विलंबामुळे नागरिकांमध्ये संताप

  अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण जखमी; वनविभागाच्या विलंबामुळे नागरिकांमध्ये संताप  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कुंड्यापाणी-बढा...

 अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण जखमी; वनविभागाच्या विलंबामुळे नागरिकांमध्ये संताप 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कुंड्यापाणी-बढाई, ता. चोपडा, जि. जळगाव : कुंड्यापाणी-बढाई परिसरात अस्वलाच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाना भारसिंग पावरा हे आपल्या बैलासाठी चारा आणण्यासाठी शेजारील शेतात गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वीही याच परिसरात एका १८ वर्षीय तरुणावर अस्वलाने हल्ला करून त्याला चावा घेतल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे परिसरात अस्वलाने दोन व्यक्तींवर हल्ला केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जनमत सेनेचे संस्थापक ॲड. युवराज बारेला यांच्याशी संपर्क साधून वनविभागाने तातडीने अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. नागरिकांच्या माहितीची दखल घेत ॲड. बारेला यांनी वनकर्मचारी, वनविभागाचे अधिकारी तसेच उपवनसंरक्षक, यावल यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. 


मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल दोन ते तीन तासांचा विलंब झाला. त्यानंतर घटनास्थळी वनविभागाकडून एक पिंजरा आणण्यात आला. मात्र अस्वलाला पकडण्यासाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

“अस्वलाचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांचे जीव वाचविणे गरजेचे आहे. केवळ पिंजरा आणून ठेवणे पुरेसे नाही,” अशी संतप्त भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, सदर अस्वल वनविभागानेच या परिसरात सोडले असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र या आरोपाची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे वनविभागाने या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जखमी नाना पावरा यांना तातडीने नुकसानभरपाईची मागणी

अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नाना भारसिंग पावरा यांना शासनाच्या नियमानुसार तातडीने नुकसानभरपाई व आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, उपचाराचा खर्च तसेच कुटुंबावर आलेला आर्थिक भार लक्षात घेऊन वनविभाग व शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.

तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तातडीने विशेष पथक तैनात करून अस्वलाचा शोध घ्यावा व त्याला सुरक्षितपणे पकडावे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जनमत सेनेचे संस्थापक ॲड. युवराज बारेला व स्थानिक नागरिकांनी केली आहे.

“नागरिकांच्या जीवाशी खेळ नको; वनविभागाने तातडीने प्रभावी कारवाई करावी आणि जखमींना नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

No comments