रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाचे आवाहन; ई-केवायसीसाठी ३१ ऑगस्ट अंतिम मुदत डॉ. अनिलकुमार पालीवाल चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सार्व...
रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाचे आवाहन; ई-केवायसीसाठी ३१ ऑगस्ट अंतिम मुदत
डॉ. अनिलकुमार पालीवाल चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन कार्डवरील प्रलंबित लाभार्थ्यांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे चोपडा तहसील प्रशासनाने कळविले आहे. चोपडा तालुक्यात PHH व AAY योजनेंतर्गत एकूण २ लाख २३ हजार ३९० लाभार्थी सदस्य असून, त्यापैकी तब्बल ४२ हजार ५६७ सदस्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. संबंधित लाभार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आपल्या जवळच्या रास्त भाव दुकानातील e-POS मशीनद्वारे अथवा ‘मेरा e-KYC’ ॲपच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
निर्धारित मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांची नावे नियमानुसार अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळली जाऊ शकतात. त्यामुळे रेशनच्या लाभावर परिणाम होऊ नये यासाठी प्रलंबित लाभार्थ्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. दरम्यान, शासकीय नोकरीत असलेल्या व्यक्ती, शासननिर्धारित निकषांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले लाभार्थी तसेच पात्रता निकषात न बसणाऱ्या कंपनीधारकांची पात्रता पडताळणी ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे.
ई-केवायसीच्या नावाखाली कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटकडे आपली वैयक्तिक कागदपत्रे देऊ नयेत. लाभार्थ्यांनी अधिकृत रास्त भाव दुकानातील e-POS मशीन किंवा अधिकृत ‘मेरा e-KYC’ ॲपच्या माध्यमातूनच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात व पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती किरण मेश्राम यांनी केले आहे. चोपडा तालुक्यातील ज्या रेशन कार्डधारकांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे, त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करून रेशन धान्याच्या लाभात भविष्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

No comments