घाडवेलच्या सुपुत्राचा २४ वर्षांच्या सेवेनंतर गौरव; सेवानिवृत्त सैनिकाची गावातून भव्य मिरवणूक स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात माजी सैनिक कमल...
घाडवेलच्या सुपुत्राचा २४ वर्षांच्या सेवेनंतर गौरव; सेवानिवृत्त सैनिकाची गावातून भव्य मिरवणूक
स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात माजी सैनिक कमलाकर धनसिंग पाटील यांचा ग्रामस्थांकडून विशेष सत्कार
अशोक कोळी चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
घाडवेल, ता. चोपडा येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कै. भाऊसो निंबा नरसिंग पाटील हायस्कूल, ग्रामपंचायत तसेच विकास सोसायटी येथे सैनिक कमलाकर धनसिंग पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी घाडवेल गावचे सुपुत्र तथा सैनिक कमलाकर धनसिंग पाटील यांच्या तब्बल २४ वर्षांच्या सेवेनंतर झालेल्या सेवानिवृत्तीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. देशसेवेत प्रदीर्घ काळ योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या पाटील यांचा ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात गौरव केला.
सैनिक कमलाकर धनसिंग पाटील यांनी आपल्या २४ वर्षांच्या सेवाकाळात प्रामाणिकपणे, शिस्तीने आणि जबाबदारीने सेवा बजावत गावाचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा आनंद ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने साजरा करत १५ ऑगस्ट रोजी गावातून भव्य मिरवणूक काढली.
या मिरवणुकीत माजी सैनिक, कार्यरत सैनिक, ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि गावच्या सुपुत्राच्या सेवानिवृत्तीचा आनंद यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
देशसेवेत २४ वर्षे योगदान दिल्यानंतर आपल्या गावात झालेल्या या जंगी स्वागताने सैनिक कमलाकर धनसिंग पाटील भारावून गेले. ग्रामस्थांनी त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

No comments