शिरसोडीतील पुलासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषणाचे हत्यार अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर : शिरसोडी येथील भवानी मात...
शिरसोडीतील पुलासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषणाचे हत्यार
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : शिरसोडी येथील भवानी माता मंदिराजवळील पुलाच्या बांधकामाचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असून, या समस्येमुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पुलाच्या बांधकामासाठी आमदार व खासदार यांची अनेक वेळा भेट घेऊन निवेदने देण्यात आली तसेच विनवण्या करण्यात आल्या. मात्र, अद्यापही या गंभीर प्रश्नाची लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर भवानी माता मंदिराजवळील पुलाचे बांधकाम तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू करावे, या मागणीसाठी शिरसोडी ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या मागणीसाठी येत्या ६ सप्टेंबर २०२६ पासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन SDO साहेबांना देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून पुलाच्या अभावामुळे ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी तसेच नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या वेळी ज्ञानदेव भोलवणकर, सुरेश फरपट, अरविंद भोलवणकर, भानुदास भोलवणकर, मलकापूर तालुकाध्यक्ष गोपाल सातव, गणेश खापरे, सुरेश जाधव, नंदू फरपट, पंकज खापरे, चेतन गटमने, अमित नारखेडे, देविदास भोंडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments