पुणे कृषि महाविद्यालयात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंती निमित्त; शेतकरी दिन साजरा शेतकऱ्यांचा सन्मान व शेतकरी -शास्त्रज्ञ संवादाचे...
पुणे कृषि महाविद्यालयात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंती निमित्त; शेतकरी दिन साजरा
शेतकऱ्यांचा सन्मान व शेतकरी -शास्त्रज्ञ संवादाचे आयोजन
शेतकऱ्यांच्या गरजा हाच कृषि संशोधनाचा केंद्रबिंदू - कुलगुरू डॉ. विलास खर्चे
जावेद शेख/ राहुरी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेतकऱ्यांच्या गरजा, अडचणी आणि बदलत्या कृषि परिस्थितीचा अभ्यास करून त्यानुसार संशोधनाची दिशा निश्चित केली पाहिजे. राज्यातील शेतकरी अत्यंत प्रगतिशील असून त्यांच्या अनुभवातून आणि अभिप्रायातून संशोधनाला नवी दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुणे येथील कृषि महाविद्यालयात पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कृषि महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय, पुणेचे अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर आदि उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. खर्चे पुढे म्हणाले की, शेतकरी हा कृषि विद्यापीठाच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. शिक्षण, संशोधन आणि विस्तार या तिन्ही क्षेत्रांत विद्यार्थी व शेतकरी हे महत्त्वाचे घटक आहेत. शास्त्रज्ञांनी शिक्षणाचे कार्य सांभाळतानाच शेतकऱ्यांना वेळ देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे. कृषि क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे संयम, सातत्य आणि शाश्वततेचा दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. बदलत्या कृषि हवामान आधारित परिस्थितीचा विचार करून पिकांची उत्पादकता कमी होण्याची कारणे शोधण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले की, जमिनीचे आरोग्य हा सध्याचा गंभीर विषय असून त्यावर व्यापक संशोधनाची आवश्यकता आहे. उद्यानविद्या क्षेत्रातील फळे, भाजीपाला आणि इतर पिकांवरील संशोधन ही विद्यापीठाची मोठी ताकद आहे. नॅनो तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत उत्पादनासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्यावर शास्त्रज्ञांनी भर दिला पाहिजे. सेंद्रिय व नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून विद्यापीठाने शास्त्रीय अभ्यासावर आधारित शिफारशी विकसित केल्या आहेत. तसेच नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. खर्चे यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन वाढविणे हा उद्देश न ठेवता उत्पादनाची गुणवत्ता, मूल्यवर्धन व प्रक्रिया यांच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. विद्यापीठामार्फत समृद्ध गाव, समृद्ध शेतकरी, मॉडेल व्हिलेज सारखे नवनवीन उपक्रम राबवून ग्रामीण विकासाला चालना देण्याचे काम सुरू आहे.
यावेळी डॉ. प्रशांत बोडके यांनी विद्यापीठाच्या संशोधन कार्याचे सादरीकरण करताना सांगितले की, शेतकरी आणि कृषि विद्यापीठ यांचे नाते अतूट असून विद्यापीठाने आतापर्यंत ३२० विविध पिकांचे वाण, दोन हजारांहून अधिक कृषि शिफारशी, ५६ कृषि यंत्रे आणि ११ पेटंट विकसित केले आहेत त्याचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे. डिजिटल कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे धोरण तयार करणारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी हे देशातील पहिले कृषि विद्यापीठ असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस पिकातील को-८६०३२ व को-२६५ तसेच डाळिंबातील फुले भगवा या वाणामुळे शेतकरी वर्गात समृद्धी आली असून भारताला डाळिंब निर्यातीमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीच्या विकासासाठी शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून २४ संशोधन प्रकल्प राबविले जात असून २४९ देशी वाण आणि २७ पिकांचे वाण जतन करण्याबरोबरच जीवामृत, घनजीवामृत तसेच सेंद्रिय शेतीशी संबंधित निविष्ठा, वाण, शिफारशी आणि कृषि यंत्रे विकसित करण्यावर विद्यापीठाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी पुणे कृषि विभागांतर्गत कार्यरत आत्मा प्रकल्पाच्या उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित श्री. शशिकांत काळोखे व खानापूर येथील महिला बचत गटाच्या श्रीमती उज्वला जावळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकरी दिनाचे औचित्य साधून उपस्थित शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नैसर्गिक शेती या विषयावर डॉ. विकास भालेराव, तर शाश्वत गोपालन या विषयावर डॉ. सुजित भालेराव व डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांत बोडके व डॉ. सुभाष भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शेतकरी संवादामध्ये विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमास नैसर्गिक शेती गट, खानापूर येथील सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती माधुरी गवळी, श्रीमती सारिका जावळकर, श्री. हनुमंत वाघ, श्रीमती शोभा वाघ, श्रीमती सुमन वाघ, श्रीमती जनाबाई जावळकर, श्रीमती योगिता जावळकर, श्रीमती कुंदा जावळकर, श्री. प्रभाकर जावळकर , श्री. रवींद्र काळोखे, श्री. अरुण मुंडे, श्री. शांताराम शेवकर आदी शेतकरी उपस्थित होते. करमाळा येथील श्री. उत्तम कदम, श्री. भागवत कदम, श्री. रंगनाथ पवार, श्री. लक्ष्मण कांबळे, श्री. दासो पवार, श्री. ज्ञानेश्वर जाधव आदी शेतकऱ्यांनीही सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष भालेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीतम शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास कृषि महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय, पुणे येथील प्राध्यापक, शास्त्रज्ञ व कर्मचारी तसेच पुणे, खानापूर, देहू, करमाळा आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111



No comments