महिला व बालविकास भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन ‘अहिल्याभवना’तून नारीशक्तीला मिळणार अधिक बळ - पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील ...
महिला व बालविकास भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन
‘अहिल्याभवना’तून नारीशक्तीला मिळणार अधिक बळ - पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील
महिलांच्या उत्कर्षाला चालना देणारे केंद्र ठरणार
श्रीरामपुर वृत्तसेवा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नारीशक्ती देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून स्त्री ही सन्मानाचे प्रतीक आहे. मातृशक्तीचे सक्षमीकरण झाल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. महिलांच्या उत्कर्षाचे काम ‘अहिल्याभवना’तून होणार असल्याने या नारीभवनाच्या माध्यमातून नारीशक्तीला बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महिला व बालविकास भवन (अहिल्याभवन) इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यात कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार श्रीमती मोनिका राजळे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
अहिल्याभवनासाठी १५ कोटींचा निधी
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, महिला व बालविकास भवनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. देशाच्या विकासामध्ये मातृशक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोविडच्या काळात अंगणवाडी सेविकांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजना ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचविण्यासोबतच आरोग्यविषयक जनजागृतीचे कामही अंगणवाडी सेविका प्रभावीपणे करत आहेत. महिलांना शेतकऱ्याचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, त्यातून महिला शक्तीचा सन्मान झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
बचतगटांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी
बचतगटांच्या उत्पादनांची विक्री केवळ स्टॉलपुरती मर्यादित न ठेवता त्यांना ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. महिलांच्या यशोगाथा तयार करून त्या इतर महिलांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. अशा यशोगाथांमुळे समाजात सकारात्मक जागृती निर्माण होईल, असे पालकमंत्री म्हणाले. बालविवाह रोखण्यासाठी सामाजिक जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. बालविवाह रोखणे हे केवळ प्रशासनाचे काम नसून समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून बालविवाहाला हद्दपार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. विखे पाटील यांनी केले.
अहिल्याभवनातून १४ कार्यालये एकाच छताखाली
आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्याभवनासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांचे आभार मानले. या इमारतीच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाच्या कामाला निश्चितच गती मिळेल. विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार श्रीमती मोनिका राजळे म्हणाल्या की, ‘अहिल्याभवना’च्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. जनतेच्या समस्यांना न्याय देण्यासाठी या वास्तूचा प्रभावी उपयोग झाला पाहिजे. इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अहिल्यानगर जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व असल्याने जिल्ह्यातील पुरातन वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी प्रास्ताविकात सांगितले की, महिला व बालविकास विभागांतर्गत असलेली १४ कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची तसेच पैशांची बचत होऊन विविध शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे.
जिल्ह्यात पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बालविवाहमुक्त अभियानाची सुरुवात करण्यात आली असून, त्यावेळी नागरिकांना बालविवाहमुक्तीची शपथ देण्यात आली होती. हे अभियान अधिक जोमाने राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षा अधिक काम केले असून, जिल्ह्यातील २० हजार ६१६ बचतगटांना कर्जवाटप करण्यात आले आहे. प्रतिपालकत्व योजनेत ५४ कोटी रुपयांचे सहाय्य देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमास महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पुंडलिक महाराज जंगले, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती बारस्कर यांच्यासह नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-------------------------------------------


No comments