adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कवी-साहित्यिक भीमराज पावरा यांच्या ‘प्रेमाची आंधळी गुंतावळ’ कादंबरीचे प्रकाशन सनपुले आश्रमशाळेत पुस्तक प्रदर्शनादरम्यान कादंबरीचे प्रकाशन; मान्यवरांकडून साहित्यिक भीमराज पावरा यांचे अभिनंदन

 जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कवी-साहित्यिक भीमराज पावरा यांच्या ‘प्रेमाची आंधळी गुंतावळ’ कादंबरीचे प्रकाशन सनपुले आश्रमशाळेत पुस्तक प...

 जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कवी-साहित्यिक भीमराज पावरा यांच्या ‘प्रेमाची आंधळी गुंतावळ’ कादंबरीचे प्रकाशन

सनपुले आश्रमशाळेत पुस्तक प्रदर्शनादरम्यान कादंबरीचे प्रकाशन; मान्यवरांकडून साहित्यिक भीमराज पावरा यांचे अभिनंदन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा: जागतिक आदिवासी दिनानिमित्त दि. ९ ऑगस्ट रोजी कवी-साहित्यिक श्री. भीमराज पावरा यांच्या ‘प्रेमाची आंधळी गुंतावळ’ या हस्तलिखित कादंबरीचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, सनपुले येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनाच्या वेळी हा प्रकाशन सोहळा पार पडला.

कोरोना काळात शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित झाले आणि ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून अनेक मुलांच्या हातात मोबाईल आला. शिक्षणाच्या साधनाच्या रूपात आलेल्या मोबाईलचा अतिरेक वापर पुढे ग्रामीण व आदिवासी भागातील बालवयीन मुलांच्या जीवनावर कसा परिणाम करू लागला, याचे विविध पैलू ‘प्रेमाची आंधळी गुंतावळ’ या कादंबरीत मांडण्यात आले आहेत.

बालवयात निर्माण होणारे प्रेमसंबंध, त्यातून नकळत होणाऱ्या चुका, त्या चुकांमुळे कुटुंबीय व नातेवाईकांना होणाऱ्या वेदना, गावपातळीवरील वाद-विवाद, निर्माण होणाऱ्या परिस्थिती आणि अखेरीस त्यातून होणारा पश्चात्ताप या विविध सामाजिक व भावनिक प्रसंगांचे प्रभावी चित्रण या कादंबरीत करण्यात आले आहे.

या कादंबरीच्या प्रकाशनप्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापक श्री. सी. डी. पाटील, माध्यमिक व उच्च माध्यमिक प्राचार्य श्री. एन. एम. पाटील, प्रा. डॉ. ए. व्ही. कचरे, प्रा. श्री. आय. डी. पावरा, प्रा. श्री. जी. पी. पाटील, श्री. पी. एल. केदारे, श्री. सी. पी. मोरे, श्रीमती ए. ए. चौधरी यांच्यासह शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी परिधान केलेली आदिवासी पारंपरिक वेशभूषा. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे पुस्तक प्रदर्शन व कादंबरी प्रकाशन कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कवी-साहित्यिक श्री. भीमराज पावरा यांच्या साहित्यिक योगदानाचे कौतुक करून ‘प्रेमाची आंधळी गुंतावळ’ या कादंबरीच्या प्रकाशनाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने साहित्याच्या माध्यमातून आदिवासी ग्रामीण जीवनातील वास्तव, बदलते सामाजिक वातावरण आणि नव्या पिढीसमोरील आव्हाने मांडण्याचा हा प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय ठरला.

No comments