adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जन्म-मृत्यू दाखले प्रकरणी तातडीने चौकशी करा; अन्यथा उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी यांना ईमेल द्वारे निवेदन सादर

 जन्म-मृत्यू दाखले प्रकरणी तातडीने चौकशी करा; अन्यथा उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी यांना ईमेल द्वारे निवेदन सादर  मुबारक तडवी रावेर / यावल (प...

 जन्म-मृत्यू दाखले प्रकरणी तातडीने चौकशी करा; अन्यथा उपोषणाचा इशारा

जिल्हाधिकारी यांना ईमेल द्वारे निवेदन सादर 


मुबारक तडवी रावेर / यावल (प्रतिनिधी) 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात जन्म-मृत्यू दाखले तयार करून देण्याच्या प्रक्रियेत कथित अनियमितता होत असल्याच्या तसेच नागरिकांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तातडीने व निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शब्बीर खान यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. जन्म-मृत्यू दाखले हे नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज असून, विविध शासकीय योजनांसह अनेक प्रशासकीय कामांसाठी त्यांची आवश्यकता असते. त्यामुळे हे दाखले देण्याच्या प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता आणि सुलभता असणे आवश्यक असल्याचे खान यांनी निवेदनात नमूद केले आहे.

यावल पंचायत समितीतील संबंधित यंत्रणेच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशीत संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, तसेच नागरिकांना कोणताही त्रास न होता त्यांना वेळेत जन्म-मृत्यू दाखले उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्यात यावी आणि नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा आपल्या मागण्यांसाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा शब्बीर खान यांनी दिला आहे.

या निवेदनामुळे यावल पंचायत समितीच्या जन्म-मृत्यू दाखला प्रक्रियेबाबत प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments