adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्जाने ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी! निधीचा वापर,विकासकामे,बिले-व्हाऊचरपासून लेखापरीक्षणातील आक्षेपांपर्यंत ग्रामस्थांचे गंभीर सवाल; गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन

कर्जाने ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी! निधीचा वापर,विकासकामे,बिले-व्हाऊचरपासून लेखापरीक्षणातील आक्षेपांपर्यंत ग्रामस्...

कर्जाने ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी!



निधीचा वापर,विकासकामे,बिले-व्हाऊचरपासून लेखापरीक्षणातील आक्षेपांपर्यंत ग्रामस्थांचे गंभीर सवाल; गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन






चोपडा तालुका प्रतिनिधी 


(संपादक : हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुक्यातील कर्जाने ग्रामपंचायतीच्या मागील कालावधीतील प्रशासकीय व आर्थिक कामकाजाची सखोल,निष्पक्ष आणि प्रत्यक्ष स्थळपाहणीसह चौकशी करण्यात यावी, ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती चोपडा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी


ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह सादर करण्यात आलेल्या या निवेदनात २०२२ ते २०२६ या कालावधीतील कामकाजाची कागदपत्रांच्या आधारे तपासणी करून निष्पक्ष व सविस्तर चौकशी अहवाल तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


निधीच्या वापरापासून विकासकामांपर्यंत तपासणीची मागणी



निवेदनात ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या विविध निधींचा वापर नियमाप्रमाणे झाला आहे का, १५ वा वित्त आयोग, मनरेगा तसेच इतर योजनांच्या निधीची तपासणी, मंजूर कामे प्रत्यक्षात झाली आहेत का, अंदाजपत्रकानुसार कामे करण्यात आली आहेत का, याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


तसेच मोजमाप पुस्तिका (MB), बिले, व्हाऊचर, पूर्णत्व प्रमाणपत्रे व संबंधित आर्थिक कागदपत्रांची तपासणी करावी, अशी स्पष्ट मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


अपूर्ण अथवा कागदोपत्री कामांवरही प्रश्नचिन्ह


मंजूर विकासकामांपैकी काही कामे अपूर्ण आहेत का, प्रत्यक्ष काम न करता निधी खर्च दाखविण्यात आला आहे का, एकाच कामाचा खर्च अथवा कामाची पुनरावृत्ती झाली आहे का, याची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून खातरजमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


कामाच्या ठिकाणी आवश्यक माहिती फलक लावण्यात आले आहेत का, ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षण अहवालातील आक्षेपांवर काय कार्यवाही झाली, तसेच ग्रामसभेतील ठरावांची अंमलबजावणी नियमानुसार झाली आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


दोष आढळल्यास आर्थिक जबाबदारी निश्चित करा


निवेदनात ग्रामपंचायतीच्या नोंदवही व आर्थिक अभिलेखांची तपासणी करण्याबरोबरच शासकीय निधीचा नियमबाह्य अथवा अनियमित वापर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा जबाबदार व्यक्तींची आर्थिक व प्रशासकीय जबाबदारी निश्चित करून नियमानुसार वसुली व कारवाई करावी, अशी कडक मागणी करण्यात आली आहे.


तसेच चौकशी पूर्ण झाल्यानंतर तयार करण्यात आलेला चौकशी अहवाल व करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती अर्जदारांना देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.


‘चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे’ — ग्रामस्थांचा आग्रह


ग्रामस्थांनी उपस्थित केलेले आरोप हे चौकशीपूर्वी सिद्ध झालेले निष्कर्ष नसून, संबंधित कागदपत्रे व प्रत्यक्ष कामांची तपासणी करून सत्यता निश्चित करण्याची मागणी असल्याचे या प्रकरणात महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत कागदपत्रांची तपासणी, प्रत्यक्ष स्थळपाहणी आणि आर्थिक पडताळणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


आता गटविकास अधिकारी या निवेदनाची दखल घेऊन नेमकी कोणती चौकशी समिती नियुक्त करतात, कागदपत्रांची तपासणी कशी होते आणि चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे कर्जाने ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


अशोक पाळवी 

ग्रामसेवक,ग्रामपंचायत कर्जाने,

या विषयाबाबत ग्रामसेवक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही व नंतर देखील त्यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.


अल्का सतीश बारेला 

(सरपंच, ग्रामपंचायत,कर्जाने),

चौकशीला पूर्ण सहकार्य तसेच वित्त आयोगाच्या निधीबाबत झालेल्या तक्रारीची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करावी, त्यासाठी ग्रामपंचायतीकडून सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातील. निधीचा खर्च शासनाच्या ऑनलाइन प्रणालीत नोंदविला जात असल्याने अपहाराचे आरोप निराधार आहेत. चौकशीत सत्य समोर येईल आणि मी पूर्ण सहकार्य करणार आहे. आरोप सिद्ध न झाल्यास बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर मानहानीची कारवाई केली जाईल,असे कळवले.

No comments