समाजकार्य महाविद्यालयात ‘माय भारत पोर्टल’ नोंदणीसह ‘नशामुक्त युवा’ अभियान विद्यार्थ्यांना माय भारत पोर्टलची माहिती; नशामुक्त भारताची सामूह...
समाजकार्य महाविद्यालयात ‘माय भारत पोर्टल’ नोंदणीसह ‘नशामुक्त युवा’ अभियान
विद्यार्थ्यांना माय भारत पोर्टलची माहिती; नशामुक्त भारताची सामूहिक शपथ
चोपडा : प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘मेरा युवा भारत’, जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी ‘माय भारत पोर्टल नोंदणी’ तसेच ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियान’ या दोन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर यांच्या हस्ते माय भारत, जळगावचे ॲम्बेसेडर कमलेश सोनवणे सर आणि चेतन पवार सर यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर कमलेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना ‘माय भारत पोर्टल’वर नोंदणी करण्याची प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून त्यांनी विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच ‘माय भारत’ पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, युवकांना उपलब्ध असलेल्या संधी आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग याबाबतही त्यांनी माहिती दिली.
यानंतर ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियान’ अंतर्गत कमलेश सोनवणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘नशामुक्त भारत’ निर्मितीची सामूहिक शपथ दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी नशामुक्तीच्या घोषणा देत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संकल्प केला.
कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना ‘मेरा युवा भारत’, जळगाव यांच्या वतीने सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संबोधी देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. आशिष गुजराथी, सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

No comments