फैजपूरचे लिलावती प्रसूतीगृह पूर्ववत सुरू करा; कब्रस्तानात मूलभूत सुविधा द्या नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; गोरगरीब नागरिकांसह मुस्ल...
फैजपूरचे लिलावती प्रसूतीगृह पूर्ववत सुरू करा; कब्रस्तानात मूलभूत सुविधा द्या
नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; गोरगरीब नागरिकांसह मुस्लिम समाजाच्या गैरसोयी दूर करण्याची मागणी
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर नगरपरिषद संचलित लिलावती प्रसूतीगृह अनेक वर्षांपासून बंद असून ते तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावे. तसेच मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानात आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शहरातील नगरसेवकांनी केली आहे. याबाबत मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात नगरसेवकांनी म्हटले आहे की, फैजपूर नगरपरिषद संचलित लिलावती प्रसूतीगृह काही काळापासून बंद अवस्थेत आहे. पूर्वी शहराची लोकसंख्या तुलनेने कमी असतानाही हे प्रसूतीगृह सुरू होते. मात्र, सध्या फैजपूर शहराची लोकसंख्या ४० हजारांपेक्षा अधिक झाली असून, शहरालगतच्या अनेक खेडेगावांतील नागरिकही विविध आरोग्य सेवांसाठी फैजपूर शहरावर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रसूतीगृह बंद असल्याने गोरगरीब महिला व नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे प्रसूतीगृह तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच फैजपूर येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानातही आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कब्रस्तानात वजू करण्यासाठी वजूखान्याची (तोंड हातपाय धुवूण्यासाठी) व्यवस्था करण्यात यावी. तसेच दफनविधीसाठी लागणारे खोदकामाचे साहित्य ठेवण्यासाठी लहान खोली बांधून देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
खिरोदा रस्त्याकडील गेटमधून इस्लामपुरा, हाजीरा मोहल्ला, तळवीवाडा, झोपडपट्टी तसेच तहानगर परिसरातील नागरिक दफनविधीसाठी कब्रस्तानात येतात. दफनविधीच्या वेळी नागरिकांना काही काळ तेथे थांबावे लागत असल्याने मूलभूत सुविधांची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या प्रशासनाने शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले लिलावती प्रसूतीगृह तातडीने सुरू करावे आणि कब्रस्तानातील मूलभूत सुविधांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
यावेळी नगरसेवक तथा स्वच्छता विभागाचे सभापती हकीम तडवी, काँग्रेसचे गटनेते शे. इरफान शे. इकबाल, माजी उपनगराध्यक्ष शे. कुर्बान, नगरसेवक डॉ. दानिश, शे. युनूस अय्युब, पवन सराफ आणि आवेश भांजा यांनी मागणी केली.

No comments