जिवंत व जुन्या झाडांची सर्रास तोड; दोषींवर कठोर कारवाई करा – नगरसेविका वर्षा आकाश चोपडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)च्या गटने...
जिवंत व जुन्या झाडांची सर्रास तोड; दोषींवर कठोर कारवाई करा – नगरसेविका वर्षा आकाश चोपडे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)च्या गटनेत्या वर्षा चोपडे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन 
संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देताना
नगरसेविका वर्षा ताई चोपडे व कल्पनाताई वाणी
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : शहरातील गंगानगर गार्डनमध्ये तसेच गार्डनच्या शेजारील परिसरातील मोठी, जाड, उंच व अनेक वर्षे जुनी असलेली जिवंत झाडे एका व्यापाऱ्यामार्फत तोडून नेल्याची गंभीर बाब समोर आली असून, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गटाच्या) नगरसेविका तथा गटनेत्या वर्षा आकाश चोपडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी नगरसेविका कल्पना वाणी उपस्थित होत्या. गंगानगर गार्डनमध्ये व गार्डनच्या शेजारील परिसरात अंदाजे ५ ते ७ मोठी व पूर्णपणे जिवंत झाडे तोडून नेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. सदर झाडे मोठ्या आकाराची व अनेक वर्षे जुनी असल्याने त्यांचे पर्यावरणीय महत्त्व मोठे होते. या झाडांमुळे नागरिकांना सावली मिळत होती तसेच शहराच्या हरित क्षेत्रातही त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.
“शहरातील जुनी व जिवंत झाडे ही केवळ मालमत्ता नसून नागरिकांची आणि पर्यावरणाची संपत्ती आहे. कोणालाही मनमानी पद्धतीने अशी झाडे तोडून नेण्याचा अधिकार नाही. जर आवश्यक परवानगी न घेता झाडे तोडण्यात आली असतील, तर संबंधितांवर कोणतीही हयगय न करता कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका नगरसेविका वर्षा चोपडे यांनी मांडली. सदर झाडे तोडण्यासाठी संबंधित व्यक्तीने नगरपालिका किंवा सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतली होती का, याची तपासणी करण्यात यावी. परवानगी घेतली असल्यास तिची प्रत, त्यातील अटी तसेच त्या अटींचे पालन करण्यात आले आहे किंवा नाही, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळी तात्काळ पाहणी करून पंचनामा करावा, तोडण्यात आलेल्या झाडांची संख्या, प्रकार, आकार व अंदाजे वय यांची नोंद करावी आणि परवानगी नसल्यास संबंधितांविरुद्ध लागू कायद्यानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तोडलेल्या झाडांचे लाकूड कुठे नेण्यात आले, त्याचा वापर अथवा विक्री करण्यात आली आहे का, याचीदेखील चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका वर्षा आकाश चोपडे यांनी केली आहे. यावल शहरातील पर्यावरणाचे संरक्षण आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
No comments