एक तासाच्या जीवघेण्या रेस्क्यूनंतर सपाट पाण्याच्या टाक्यात अडकलेल्या नंदीला जीवदान; गौसेवकांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक पल्लवी पाटील खामगाव...
एक तासाच्या जीवघेण्या रेस्क्यूनंतर सपाट पाण्याच्या टाक्यात अडकलेल्या नंदीला जीवदान; गौसेवकांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव शहरातील बारादरी परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेत सपाट पाण्याच्या टाक्यात अडकलेल्या बेवारस नंदीला एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या गौसेवकांनी तब्बल एक तास जीवाची बाजी लावत रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढले. या धाडसी बचावकार्याचे परिसरातील नागरिकांनी भरभरून कौतुक केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बारादरी परिसरातील अशोक गेस्ट हाऊस शेजारी राहणारे झुनझुनवाला यांच्या घराचा गेट उघडा असल्याने एक बेवारस नंदी घराच्या आवारात शिरला. आवारातील पाण्याच्या टाक्यावर ठेवलेल्या पटल्यावर चढताच नंदीच्या वजनामुळे पटला तुटला आणि नंदी थेट सिमेंटने घोटाई केलेल्या खोल पाण्याच्या टाक्यात पडला.
टाक्याच्या आतील भिंतींवर शेवाळ असल्यामुळे नंदीचे पाय वारंवार घसरत होते. त्यामुळे त्याला बाहेर पडणे अशक्य झाले होते. घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे गौसेवक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
सुरजभैय्या यादव, गौरव कवटेकर, राहुल ठाकूर, नितीन चंदेल, पवन वानखडे, मोहन उगले, विलास क्षिरसागर, पियुष झुनझुनवाला, लाखाभाई यांच्यासह इतर गौसेवकांनी जीवाची पर्वा न करता रेस्क्यू सुरू केले. नंदीचे वजन जास्त असल्यामुळे पहिल्याच प्रयत्नात दोरी तुटली. मात्र गौसेवकांनी हार न मानता पुन्हा नियोजनबद्ध प्रयत्न केले आणि तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर नंदीला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले.
बाहेर आल्यानंतर नंदीने मोकळा श्वास घेतला आणि कोणतीही गंभीर दुखापत न होता तो स्वतःच्या पायावर चालत निघून गेला. या धाडसी बचाव मोहिमेमुळे एका मुक्या प्राण्याचे प्राण वाचले असून परिसरातील नागरिकांनी गौसेवकांच्या तत्परता, धाडस आणि सेवाभावी वृत्तीचे मनापासून कौतुक केले.
एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनकडून भविष्यातही अशाच प्रकारे गौसेवा आणि समाजसेवेचे कार्य सातत्याने सुरू राहील, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


No comments