निलंग्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी लढा पेटला ; १५ ऑगस्टनंतर अन्नत्यागाचा इशारा! सर्वे नं. १७३ मधील जागा तात्काळ वर्ग करून मालमत्ता...
निलंग्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी लढा पेटला ; १५ ऑगस्टनंतर अन्नत्यागाचा इशारा!
सर्वे नं. १७३ मधील जागा तात्काळ वर्ग करून मालमत्ता रजिस्टरवर नोंद करण्याची मागणी; उपोषणाचा आज तिसरा दिवस..
लातूर,प्र. उत्तम माने
(संपादक -:-:हेमकांत गायकवाड)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी अशोक नगर निलंगा येथील सर्वे नं. १७३ मधील जागा तात्काळ नगरपालिकेकडे वर्ग करून तिची अधिकृत नोंद करण्यात यावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने उपोषणकर्त्यांचा संताप वाढत असून, १५ ऑगस्टनंतर आंदोलन आणखी तीव्र करून अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अशोक नगर, मिलिंद नगर, बौद्ध नगर, पेठ सम्राट नगर आदी परिसरातील आंबेडकर अनुयायी व नागरिकांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या या आंदोलनाने आता गंभीर वळण घेतले आहे. सर्वे नं. १७३ मधील सुमारे २०० बाय १८० क्षेत्रफळाची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहासाठी तात्काळ महसूल विभागाने नगरपालिकेकडे वर्ग करावी, तसेच संबंधित जागेची नोंद ७/१२ मधून आवश्यक ती कार्यवाही करून नगरपालिकेच्या ८-अ उताऱ्यावर व मालमत्ता रजिस्टरवर करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
अशोक नगर येथील हे मैदान गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांच्या जयंती, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम तसेच परिसरातील गोरगरीब नागरिकांच्या विवाह सोहळ्यांसाठी वापरले जात असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या जागेचा प्रश्न हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून अनेक पिढ्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक हक्काशी निगडित प्रश्न असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. “वर्षानुवर्षे आश्वासने ऐकायची, निवडणुकीच्या काळात मागणीची दखल घ्यायची आणि सत्ता मिळाल्यानंतर मात्र त्याच मागणीला केराची टोपली दाखवायची, हे आता सहन केले जाणार नाही,” अशी संतप्त भावना आंदोलनस्थळी व्यक्त होत आहे.
यावेळी बोलताना अंकुश ढेरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सर्वे नं. १७३ मधील जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतिक सभागृहासाठी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. २०२५ च्या नगरपालिका निवडणुकीतही याच मागणीबाबत आश्वासने देण्यात आली; मात्र सत्ता मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे ढेरे यांनी सांगितले.
“आंबेडकर अनुयायांच्या मतांवर सत्ता मिळवायची आणि त्यानंतर त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे पाठ फिरवायची, ही भूमिका आता चालणार नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,” असा इशारा ढेरे यांनी दिला.
रजनीकांत कांबळे यांनीही प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. निवडणुका आल्या की शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करायचा, मतांचा जोगवा मागायचा आणि सत्ता मिळाल्यानंतर आंबेडकर अनुयायांना त्यांच्या मूलभूत मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ आणायची, ही भूमिका निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
“बाबासाहेबांच्या नावाचा केवळ राजकीय वापर नको; त्यांच्या अनुयायांना न्याय हवा. सांस्कृतिक सभागृहासाठी जागा द्या आणि हा प्रश्न कायमचा निकाली काढा,” अशी मागणी कांबळे यांनी केली.
या मागणीला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. १९८२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या सांस्कृतिक जागेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता, असा दावा आंदोलकांनी केला. मात्र, त्यानंतर तब्बल चार दशकांहून अधिक काळ उलटूनही सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त होत आहे.
याच सर्वे नं. १७३ मधील जागेचा इतर समाजांच्या विविध सार्वजनिक कारणांसाठी वापर किंवा वर्गीकरण होत असेल, तर आंबेडकर अनुयायांच्या सांस्कृतिक सभागृहासाठी जागा देण्यास प्रशासनाला अडचण नेमकी काय? असा सवाल प्रा. रोहित बनसोडे यांच्यासह उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रा. रोहित बनसोडे यांनी महसूल व नगरपालिका प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना सांगितले की, सर्वे नं. १७३ मधील जागा तात्काळ नगरपालिकेकडे वर्ग करून तिची अधिकृत नोंद मालमत्ता रजिस्टरवर करण्यात यावी. अन्यथा लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. आंबेडकर अनुयायांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते व समाजघटकांकडून जाहीर पाठिंबा मिळत आहे. साई क्रिटिकल हॉस्पिटलचे प्रमुख तथा जिल्हा डॉक्टर लीगलचे अध्यक्ष डॉ. अरविंद भातंबरे, चक्रधर शेळके, नगरपालिकेच्या माजी सभापती गंगुताई कांबळे यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
१५ ऑगस्टनंतर ‘अन्नत्याग’ प्रशासनासमोर निर्णायक आव्हान..
सलग तीन दिवसांपासून उपोषण सुरू असूनही मागणीवर ठोस निर्णय होत नसल्याने उपोषणकर्त्यांचा आक्रोश तीव्र झाला आहे. १५ ऑगस्टपर्यंत प्रशासनाने सर्वे नं. १७३ मधील जागेबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर त्यानंतर अन्नत्याग उपोषण सुरू करून आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
हे आंदोलन केवळ एका सभागृहासाठी नसून शहरातील हजारो आंबेडकर अनुयायांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कासाठीचा लढा आहे, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता प्रशासन या मागणीवर तोडगा काढते की आंदोलनाची पुढील ठिणगी मोठ्या संघर्षात परिवर्तित होते, याकडे निलंगा शहरासह आंबेडकरी चळवळीचे लक्ष लागले आहे.
या बेमुदत धरणे उपोषणात ज्येष्ठ नेते विलास सूर्यवंशी, अंकुश ढेरे, रजनीकांत कांबळे, प्रा. रोहित बनसोडे, धम्मानंद काळे, प्रदीप कांबळे, रामलिंग पटसाळगे, प्रकाश कांबळे, निलेश गायकवाड, संजय सोनकांबळे, लहू ढेरे, अंकुश कांबळे, दिगंबर सूर्यवंशी, अभय ढेरे, दीपक मंजुळे, चंद्रकांत भोसले, धनराज कांबळे, तानाजी सुरवसे, शंकर लोंढे यांच्यासह शेकडो आंबेडकरी अनुयायी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

No comments