सुटकार येथे हातभट्टी दारू निर्मितीवर अडावद पोलिसांची धडक कारवाई; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त रविंद्र कोळी/ खलिल तडवी अडावद (संपादक -:- हे...
सुटकार येथे हातभट्टी दारू निर्मितीवर अडावद पोलिसांची धडक कारवाई; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
रविंद्र कोळी/ खलिल तडवी अडावद
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : तालुक्यातील सुटकार गावालगत गावठाण परिसरात हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या रसायनासह भट्टीचे साहित्य आढळून आल्याने अडावद पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडावद पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, शरद भागवत ठाकरे (वय ३८, रा. सुटकार, ता. चोपडा, जि. जळगाव) हा गावालगतच्या खळ्यात हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन व इतर साहित्य ठेवून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली.
या कारवाईत १ लाख ६० हजार रुपये किमतीचे ५ प्लास्टिकचे २०० लिटर क्षमतेचे निळ्या रंगाचे ड्रम असल्याचे नमूद असून, त्यामध्ये गूळ-नवसागर मिश्रित कच्चे रसायन आढळून आले. तसेच ३ हजार रुपये किमतीची लाकडी पेटी, त्यावर १०० लिटर क्षमतेची लोखंडी पत्रीची टाकी व त्यामध्ये अंदाजे ५० लिटर उकळते रसायन, तसेच गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे भट्टीचे साहित्य आढळले. याशिवाय २ हजार रुपये किमतीचे सुमारे २० लिटर तयार गावठी दारू व प्लास्टिक कॅन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फिर्यादी पोहेकॉ. मधुकर नामदेव पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५४/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (फ), (ब), (क), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोहेका मधुकर पवार, पोहेका विनोद धनगर, पोका प्रदीप पाटील यांनी सहभाग घेतला. तर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका चंदूलाल सोनवणे करीत आहेत.
पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

No comments