राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम उत्साहात विद्यार्थ्यांनी घेतला क्रीडा, शिस्त व निरोगी जीवनशैलीचा संदेश राष्ट्रीय क्रीडा दिनानिमि...
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम उत्साहात
विद्यार्थ्यांनी घेतला क्रीडा, शिस्त व निरोगी जीवनशैलीचा संदेश 
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलीस अधिकारी, मान्यवर व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
चोपडा : प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथे भारताचे महान हॉकीपटू तथा ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर, पोलीस अधिकारी, महाविद्यालयीन कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडाचे महत्त्व, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक पवन देसले, प्रा. डॉ. सौ. संध्या एम. सोनवणे, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रा. डॉ. के. सोनवणे, प्रा. डॉ. बी. एम. सपकाळ, डॉ. एस. ए. वाघ, सणवायक श्री. डी. एम. पाटील, प्रभारी रजिस्ट्रार तसेच महाविद्यालयातील कर्मचारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला. भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळात त्यांच्या योगदानाला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने १९२८, १९३२ आणि १९३६ या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या अतुलनीय क्रीडा कौशल्यामुळे आणि भारतीय हॉकीला मिळवून दिलेल्या गौरवामुळे त्यांच्या जयंतीचा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमादरम्यान क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम, विविध खेळांमध्ये सहभाग आणि सक्रिय जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यात आला.
राष्ट्रीय क्रीडा दिन हा केवळ खेळाडूंचा गौरव करण्याचा दिवस नसून, ‘खेळा, तंदुरुस्त राहा आणि निरोगी जीवन जगा’ हा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

No comments