adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पर्यावरणपूरक अस्थीविसर्जनाचा आदर्श : वरखेड येथील तायडे परिवाराचा समाजाला प्रेरणादायी संदेश

 पर्यावरणपूरक अस्थीविसर्जनाचा आदर्श : वरखेड येथील तायडे परिवाराचा समाजाला प्रेरणादायी संदेश  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकव...

 पर्यावरणपूरक अस्थीविसर्जनाचा आदर्श : वरखेड येथील तायडे परिवाराचा समाजाला प्रेरणादायी संदेश 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पारंपरिक प्रथेला सकारात्मक दिशा देत मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील तायडे परिवाराने अस्थीविसर्जनासाठी एक पर्यावरणपूरक आणि समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम राबविला आहे. ९८ वर्षीय गं. भा. प्रभावतीबाई तायडे यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी नदीत किंवा संगमावर विसर्जित न करता स्वतःच्या शेतात विधीवत विसर्जन करण्यात आले. त्याच ठिकाणी पवित्र तुळशीचे रोप लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करत प्रभावतीबाईंना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

वरखेड येथील रहिवासी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव इंजि. सचिन तायडे यांच्या आजी व गावचे माजी सरपंच निवृत्ती तायडे यांच्या मातोश्री गं. भा. प्रभावतीबाई तायडे यांचे ३१ जुलै रोजी निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळीही पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करत शेणाच्या गोवऱ्यांच्या माध्यमातून अंत्यविधी करण्यात आला होता.

त्यानंतर २ ऑगस्ट रोजी झालेल्या अस्थीविसर्जनाच्या कार्यक्रमातही तायडे परिवाराने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अस्थींचे विसर्जन शेतातच केले. त्या ठिकाणी धार्मिक, आरोग्यदृष्ट्या व पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या तुळशीचे रोप लावून त्याच्या संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.

हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे. प्रत्येक धार्मिक विधीत तुळशीचे महत्त्व असून तिचे औषधी गुणधर्मही सर्वश्रुत आहेत. तुळस वातावरण शुद्ध ठेवण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास तसेच पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त मानली जाते. त्यामुळे तुळशीच्या रूपाने प्रभावतीबाईंच्या स्मृती कायम जिवंत राहतील, अशी भावना तायडे परिवाराने व्यक्त केली.

या उपक्रमामुळे नदी व जलस्रोतांमध्ये अस्थीविसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यास मदत होणार असून, पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी सामाजिक संदेशही समाजापर्यंत पोहोचत आहे. परंपरा जपत पर्यावरणाची जबाबदारी स्वीकारणारा तायडे परिवाराचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

------------------------------------------------------------------

"आजींच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि जलप्रदूषण टाळून पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, या हेतूने आम्ही हा उपक्रम राबविला आहे. आज आजी आमच्यात नसल्या तरी तुळशीच्या रूपाने त्या कायम आमच्यासोबत राहतील. प्रत्येकाने अशा पर्यावरणपूरक निर्णयाचा विचार करावा."

— इंजि. सचिन तायडे

जिल्हा सचिव, मराठा सेवा संघ

No comments