श्री एकविरा माता आश्रम शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी एरंडोल प्रतिनिधी (संपादक -;- हेमकांत ...
श्री एकविरा माता आश्रम शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
एरंडोल प्रतिनिधी
(संपादक -;- हेमकांत गायकवाड)
दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी श्री एकविरा माता अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, पातरखेडा (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच वंचित, शोषित समाजाचे महान साहित्यिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत श्रद्धापूर्वक व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. संस्थेचे संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोक डी. माळी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले, तर संस्थेचे संचालक व प्रमुख पाहुणे श्री सोमसिंग पाटील (राहुल दादा) यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावर्षी महाराष्ट्र शासनाने १ ऑगस्ट हा अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन "लेखन प्रेरणा दिन" म्हणून घोषित केल्याने कार्यक्रमात त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात श्री अशोक डी. माळी यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे श्री सोमसिंग पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीसह इतर साहित्यकृतींमधून कष्टकरी व वंचित समाजाच्या संघर्षाचे प्रभावी चित्रण विद्यार्थ्यांसमोर मांडले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद महाजन यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही प्रभावी भाषणे सादर केली, तर शिक्षकांनी महापुरुषांच्या कार्याचा गौरव करत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसरात आकर्षक रांगोळ्यांद्वारे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांची चित्रे साकारून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भूषण बाविस्कर यांनी केले. प्रास्ताविक श्री प्रताप पाटील यांनी केले, तर श्री आबा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष श्री मनोहर पाटील यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री युवराज चौधरी तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.


No comments