adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंचनामा झाला, त्रुटीही उघड झाल्या; मग बिल काढण्याची घाई कशासाठी? — नंदा महाजनांचा प्रशासनाला सवाल

  पंचनामा झाला, त्रुटीही उघड झाल्या; मग बिल काढण्याची घाई कशासाठी? — नंदा महाजनांचा प्रशासनाला सवाल  यावल प्रतिनिधी/ भरत कोळी  (संपादक -:- ह...

 पंचनामा झाला, त्रुटीही उघड झाल्या; मग बिल काढण्याची घाई कशासाठी? — नंदा महाजनांचा प्रशासनाला सवाल 




यावल प्रतिनिधी/ भरत कोळी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत यावल नगरपरिषदेमार्फत सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामावरून भाजप गटनेत्या तथा नगरसेविका सौ. नंदा राजेंद्र महाजन यांनी नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरले आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत आणि नियमांच्या पालनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत त्यांनी संबंधित कामाची सखोल चौकशी करून दोष दूर होईपर्यंत देयके अदा करू नयेत, अशी मागणी केली आहे.

सौ. नंदा महाजन यांनी मुख्याधिकारी, यावल नगरपरिषद यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. संबंधित कामासाठी नियुक्त एजन्सीमार्फत काम सुरू असले तरी प्रत्यक्ष कामाच्या गुणवत्तेबाबत आणि अटी-शर्तींच्या पालनाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

पत्रानुसार, यापूर्वीही संबंधित कामाबाबत प्रशासनाच्या निदर्शनास बाबी आणून देण्यात आल्या असून, कामाची पाहणी व तपासणी करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कामाच्या गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.

“कामाची पाहणी करून त्रुटी निदर्शनास आणल्यानंतरही त्यावर योग्य ती कार्यवाही होत नसेल, तर संबंधित कामाचे बिल काढण्याची घाई कशासाठी?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, PMC मार्फत करण्यात येणारे नियंत्रण व पर्यवेक्षण तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक तपासणी झाली आहे का? याबाबतही त्यांनी प्रशासनाकडून स्पष्टता मागितली आहे. काम नियमांनुसार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने झाले आहे की नाही, याची खात्री झाल्याशिवाय संबंधित कंत्राटदाराला देयक अदा करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

चौकशी करून दोष दूर करण्याची मागणी

सौ. नंदा महाजन यांनी प्रशासनाकडे संबंधित कामाची संपूर्ण चौकशी, प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी केली आहे. कामामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या संबंधित कंत्राटदाराकडून दुरुस्त करून घेण्यात याव्यात आणि त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

यावल शहरातील घनकचरा व्यवस्थापन हा नागरिकांच्या आरोग्याशी आणि शहराच्या स्वच्छतेशी थेट संबंधित विषय आहे. त्यामुळे सरकारी निधीतून होणाऱ्या कामात कोणतीही तडजोड होऊ नये आणि नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी मागणी महाजन यांनी केली आहे.

“कामाची गुणवत्ता, नियमांचे पालन आणि प्रशासनाची देखरेख याबाबत समाधानकारक अहवाल मिळाल्याशिवाय बिल अदा करू नये,” अशी स्पष्ट भूमिका घेत नंदा महाजन यांनी प्रशासनाच्या भूमिकेकडे आता लक्ष वेधले आहे.

स्वच्छ भारत मिशन (शहरी) 2.0 मध्ये शहरांना ‘Garbage Free’ करण्यासाठी कचऱ्याचे संकलन, वाहतूक, वर्गीकरण व वैज्ञानिक प्रक्रियेला महत्त्व देण्यात आले आहे.

No comments