पोलीस बांधवांना दिव्यांग भगिनींनी राखी बांधून साजरे केलं रक्षाबंधन कर्तव्य बजावताना कुटुंबापासून दूर असलेल्या पोलिसांना दिव्यांग भगिनींच्...
पोलीस बांधवांना दिव्यांग भगिनींनी राखी बांधून साजरे केलं रक्षाबंधन
कर्तव्य बजावताना कुटुंबापासून दूर असलेल्या पोलिसांना दिव्यांग भगिनींच्या राखीतून मिळाला आपुलकीचा आधार
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव : रक्षाबंधन पौर्णिमेचे औचित्य साधून दिव्यांग सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या विराट मल्टिपर्पज फाउंडेशनच्या वतीने खामगाव शहरात एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षा कविताताई इंगळे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग भगिनींनी खामगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांना भेट देत पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.
सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेकदा आपल्या कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावावे लागते. या पार्श्वभूमीवर पोलीस बांधवांना कुटुंबाची उणीव भासू नये, तसेच ‘आपलेही कोणीतरी आहे’ ही आपुलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने फाउंडेशनच्या वतीने हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी दिव्यांग भगिनींनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंदार पुरी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर तावडे, शहर पोलीस ठाण्यातील राजू भाऊ कोल्हे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधली. तसेच पोलीस बांधवांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.
पोलीस बांधवांनीही दिव्यांग भगिनींचे औक्षण करून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या सुख-दुःखात कायम पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.
दिव्यांग भगिनी आणि पोलीस बांधवांमधील या प्रेमळ बंधाचा क्षण उपस्थितांसाठी भावूक करणारा ठरला. या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आणले. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकी, प्रेम, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचे नाते निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे खामगावकरांकडून कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी विराट मल्टिपर्पज फाउंडेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षा कविताताई इंगळे, पल्लवीताई पाटील, पूनमताई चव्हाण, सरलाताई देशमुख, सविताताई चव्हाण, सोळंकेताई यांच्यासह फाउंडेशनच्या अनेक कार्यकर्त्या व दिव्यांग भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments